Ram Gopal Varma Post about Raja Shivaji Movie: रितेश देशमुखचा महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ १ मे रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी सुरू केली आहे. या चित्रपटाच्या यशाची चर्चा आता बॉलिवूडमध्येही रंगू लागली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रितेश आणि जिनिलीया देशमुखचे अभिनंदन केले आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश अक्षरशः त्यांचा पुनर्जन्म असल्यासारखा वाटत आहे,” अशा शब्दांत वर्मा यांनी रितेशच्या अभिनयाचं कौतुक केलं.

मागील काही दिवसांपासून दाऊद इब्राहिमसंदर्भात वक्तव्य केल्यामुळे चर्चेत राहिलेले प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनादेखील ‘राजा शिवाजी’ सिनेमाने भुरळ घातली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील

रितेशच्या अभिनयाबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“जिनिलीया देशमुख तुझा राजा शिवाजी चित्रपट ज्या पद्धतीने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढत आहे, त्याबद्दल तुझे अभिनंदन! दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दोन्ही रूपांत रितेश देशमुख चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तो अक्षरशः त्यांचा पुनर्जन्म असल्यासारखा वाटत आहे,” अशी पोस्ट एक्सवर राम गोपाल वर्मा यांनी केली आहे.

ram-gopal-varma-tweet-raja-shivaji-movie-riteish-deshmukh
राम गोपाल वर्मांची पोस्ट (सौजन्य – एक्स)

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने १२.४० कोटी रुपये कमावले आणि जबरदस्त ओपनिंग केली. हा सर्वाधिक ओपनिंग करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. इतकंच नाही तर यंदाचा सर्वाधिक ओपनिंग करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. शुक्रवारी दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाच्या वीकेंडच्या कलेक्शनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दाऊद इब्राहिममुळे माझं घर चालतंय, राम गोपाल वर्मांचे वक्तव्य

‘फिल्मफेअर’शी बोलताना राम गोपाल वर्मांनी म्हटलं की, त्यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘गन्स अँड थाईज’ दाऊद इब्राहिमला समर्पित केलं होतं, पण प्रकाशकांनी त्याचं नाव काढून टाकले. “मी ते पुस्तक दाऊद इब्राहिमलाही समर्पित केलं होतं, पण प्रकाशकांनी त्याचं नाव हटवलं. जर दाऊद इब्राहिम नसता, तर मी ‘सत्या’ आणि ‘कंपनी’सारखे दोन अजरामर चित्रपट बनवू शकलो नसतो. मग मी त्याला हे पुस्तक कसे समर्पित करणार नाही? त्याच्यामुळेच मी आज माझं घर चालत आहे,” असं राम गोपाल वर्मा म्हणाले.

९० च्या दशकात इतर कलाकार आणि दिग्दर्शकांप्रमाणे त्यांना कधी धमक्यांचे फोन आले का? त्यावर ते म्हणाले, “मी एकमेव असा माणूस होतो ज्याला कधीच धमक्यांचे फोन आले नाहीत, कारण त्यांना ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ हे चित्रपट खूप आवडले होते. त्यांना मला त्रास द्यायचा नव्हता. मी एक प्रकारे त्यांचा ‘सोलमेट’ झालो होतो.”