Ram Gopal Verma on FWICE : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह जोरदार चर्चेमध्ये आला आहे. ‘डॉन ३’ चित्रपटातून अचानक माघार घेतल्यामुळे ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ने (FWICE) त्याच्या विरोधात असहकार निर्देश जारी केला आहे. यामुळे रणवीर सिंहच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता आहे. बॉलीवूडच्या कलाकारांकडून रणवीर सिंहला समर्थन मिळत आहे. अनेकांनी त्याच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट केली आहे. दरम्यान, चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनीदेखील एक्स पोस्ट करत रणवीर सिंहवरील कारवाईवर मत मांडले. त्यांनी FWICE ला कांगारूंचे कोर्ट म्हटले असून, रणवीरचे यश बघून घाबरलेल्या लोकांनी हा निर्णय घेतला असल्याचे राम गोपाल वर्मा यांनी म्हटले आहे.
चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा हे त्यांच्या परखड आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये एक्स पोस्ट करून FWICE च्या कारभारावर आणि निर्णयावर ताशेरे ओढले आहेत आणि रणवीर सिंहचे समर्थन केले आहे. राम गोपाल वर्मा यांनी लिहिले आहे की, खरे तर रणवीर सिंहवर नाही तर FWICE वर बंदी घाला. गांधी स्टाईलची ही तथाकथित बंदी शेवटी मोठा विनोद ठरणार आहे. ही लढाई इंडस्ट्रीतील कामगारांच्या संरक्षणाची नाही तर जुन्या पद्धतीच्या संघटनेची ताकद दाखवण्याची धडपड आहे, असे ते म्हणाले आहेत.
‘धुरंधर’ चित्रपटाच्या यशामुळे लोक घाबरले
राम गोपाल वर्मा म्हणाले की, FWICE हे काय न्याय देणारे कोर्ट नाही तर कांगारू कोर्ट आहे, त्यामुळे फक्त स्वतःची ताकद दाखवण्यासाठी हे असे निर्णय घेतले जात आहेत. हे निर्णयसुद्धा बंद दाराआड, ठारविक लोक घेत आहेत, ज्यामध्ये रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटाला दमदार यश मिळाल्यामुळे घाबरलेल्या लोकांचा समावेश आहे, असे स्पष्ट मत राम गोपाल वर्मा यांनी व्यक्त केले आहे.
हा विषय त्या दोन पार्टीपुरताच मर्यादित – राम गोपाल वर्मा
पुढे ते म्हणाले की, ही संस्था जरी ५ किंवा ५० लाख कामगारांची संघटना असल्याचा दावा करीत असली तरी नेमके काय झाले आहे हे त्यातील अनेक लोकांना माहीतसुद्धा नाही. FWICE साठी हा मोठा पीआर डिझास्टर ठरणार आहे. फक्त सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि सहानुभूती मिळावी म्हणून हे प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी एका निर्मात्याचे प्री-प्रॉडक्शनमध्ये झालेले नुकसान हा दावा आहे. पण, हा दोन पार्टीमधील कॉन्ट्रक्टचा खासगी वाद आहे. असे कॉन्ट्रक्टवरून देशभरामध्ये दररोज लाखो वाद होतात, तेव्हा FWICE कुठे असते? या करारामधील वाद आणि नेमके काय झाले आहे हे फक्त त्याच दोन पार्टींना माहिती असेल, त्यामुळे इतर केसप्रमाणे याचा निकालसुद्धा कोर्टामध्ये लावला पाहिजे. कोणत्याही एका पार्टीने न्यायालयामध्ये दाद मागितली तर त्यावर निकाल दिला जाईल. हा विषय त्या दोन पार्टीपुरताच मर्यादित असायला पाहिजे, असे स्पष्ट मत राम गोपाल वर्मा यांनी व्यक्त केले आहे.
BAN “FWICE” and not @RanveerOfficial
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 29, 2026
The so called “BAN” or non co operation in the style of Gandhiji , will eventually become a BIG FAT JOKE on FWICE
This isn’t industry or worker protection, like they are claiming. It is just a pure performative muscle flexing , by an…
FWICE मुळे नाही तर रणवीरसारख्या कलाकारांमुळे रोजगार
पुढे राम गोपाल वर्मा म्हणाले की, जर रणवीरमुळे त्या निर्मात्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे तर त्यांनी पुरावे घेऊन समोर यावे. जर त्या निर्मात्यावर अन्याय झाला असेल, तर मग इतर निर्मात्यांनी रणवीरसोबत काम करू नये अशी भूमिका घ्यावी. पण, खरे तर असे आहे की रणवीरने एक होकार दिला तर त्याच्या घराबाहेर एक किलोमीटरपर्यंत निर्मात्यांच्या रांगा लागतील. FWICE ने कितीही नकार किंवा इशारा दिला तरी निर्माते त्याच्यासह काम करतील, याची FWICE सुद्धा कल्पना आहे, असे ते म्हणाले.
रणवीर सिंहसारख्या कलाकारांमुळे रोजगार निर्मिती
राम गोपाल वर्मा म्हणाले की, कारण कटू सत्य हेच आहे की, रणवीरसारखे स्टार्स थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणतात. FWICE सारख्या संस्था बॉक्स ऑफिसवर चालत नाहीत. त्यासाठी स्टार कलाकार लगातात. या कलाकारांमुळेच रोजगार निर्माण होत असतात FWICE मुळे नाही. स्टार्स आहेत म्हणून इंडस्ट्री आहे आणि इंडस्ट्री आहे म्हणून FWICE आहे, असे स्पष्ट मत चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी मांडले आहेत. त्यांनी रणवीर सिंहला समर्थन देत FWICE प्रसिद्धीसाठी हे करत असल्याचे म्हटले आहे.
