Ram Gopal Varma Talk About A.R. Rahman : राम गोपाल वर्मा यांचं नाव घेतलं की, ‘शिवा’, ‘सत्या’, ‘कंपनी’ किंवा ‘सरकार’ असे काही चित्रपट डोळ्यांसमोर येतात. पण, १९९५ मधील त्यांचा म्युझिकल चित्रपट ‘रंगीला’चीही तितकीच चर्चा होताना दिसते. ‘रंगीला’मध्ये जॅकी श्रॉफ, आमिर खान व ऊर्मिला मातोंडकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यात आणखी मोठा वाटा होता तो संगीतकार ए. आर. रहमान यांच्या संगीताचा.

आज रहमान यांचं संगीत जगभरात ऐकलं जातंय. जगभरात त्यांच्या संगीताचे चाहते आहेत. अशातच अलीकडेच राम गोपाल वर्मा यांनी पिंकविलाच्या मुलाखतीत ‘रंगीला’चं गाणं करतानाच्या अडचणी सांगितल्या. राम गोपाल वर्मा यांनी सांगितलं की, रहमानची काम करण्याची पद्धत त्यांना आवडली नव्हती. राम गोपाल वर्मांच्या मते, रहमान त्याचं काम कायमच उशिरानं देण्यासाठी ओळखला जायचा. अशातच राम गोपाल वर्मा यांनी रहमान यांच्या ‘रंगीला’मधल्या ‘हाय रामा’ गाण्याचा किस्सा सांगितला आहे.

राम गोपाल वर्मा म्हणाले, “आम्ही ‘हाय रामा’ गाणं करण्यासाठी गोव्याला गेलो होतो. पाच दिवस तिथे होतो. पहिल्या दिवशी रहमान म्हणाला, ‘रामू, मी काहीतरी वेगळा विचार करतोय… तुला उद्या गाणं ऐकवतो.’ दुसऱ्या दिवशी तो काहीतरी वेगळंच बोलला. तिसऱ्या दिवशीही तेच. असं करत करत पाच दिवस गेले; पण त्यानं काहीच तयार केलं नाही. मग म्हणाला, ‘मी चेन्नईला जातो आणि तिथून गाणं पाठवतो’.”

राम गोपाल वर्मा पुढे म्हणाले, “नंतर मग रहमान मला म्हणाला, ‘पुढच्या वेळी मला हॉटेलमध्ये आणलंस, तर तिथे टीव्ही नसू दे. मी एवढा वेळ फक्त टीव्हीच पाहत होतो.’ तेव्हा मला खरंच त्याला मारावंसं वाटलं. पण, शेवटी त्यानं ‘हाय रामा’ गाणं करून दिलं. तेव्हा त्यानं कधी कधी एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी थांबण्याची आणि संयमाची गरज असते, हे सिद्ध केलं.”

‘रंगीला’ला ३० वर्षं पूर्ण झाल्यानंतर O2 इंडियाशी बोलताना राम गोपाल वर्मा यांनी ‘हाय रामा’ गाणं पहिल्यांदा ऐकलं होतं, तेव्हाचा अनुभव सांगितला. ते म्हणालेले, “मला एक अतिशय रोमँटिक गाणं हवं होतं. ‘मिस्टर इंडिया’मधलं ‘काँटे नहीं कटते’ गाणं माझ्या डोक्यात होतं. मी त्याला गाणं आणि त्यावर चित्रीकरण कसं असणार हे समजावून सांगितलं आणि त्यानं ही धून तयार केली.”

त्यानंतर राम गोपाल वर्मा म्हणाले, “मला वाटलं हा (रहमान) वेडा झाला आहे. त्यानं चुकून मला काहीतरी वेगळंच एखादं शास्त्रीय कर्नाटक राग असलेलं गाणं पाठवलंय. मग मी त्याला फोन केला आणि म्हणालो, ‘मला रोमँटिक गाणं हवं होतं आणि तू हे काय पाठवलंयस?’ त्यावर रहमान म्हणाला, ‘सर, हेच संगीत त्या सीनसाठी योग्य आहे.’ सुरुवातीला मला ते पटलं नाही; पण नंतर मी ते गाणं वारंवार ऐकल्यावर मला आवडू लागलं. माझ्याकडे गाण्याची सीडी होती. मी मधे-मधे ती वाजवत राहिलो आणि मग मला ते गाणं हळूहळू आवडू लागलं.”