थ्रीलर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या अब्बास मस्तान यांचा २००१ मध्ये आलेला प्रेमपट म्हणजे ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत होता. तर त्याच्या दोन नायिका होत्या एक होती राणी मुखर्जी आणि दुसरी होती प्रीती झिंटा. सरोगसी या विषयावर हा चित्रपट बेतलेला होता. मात्र बॉलिवूडमध्ये हा चित्रपट गाजला तो वेगळ्याच वादामुळे. या चित्रपटाला मुंबईतल्या अंडरवर्ल्ड मधून पैसे लागले आहेत असा आरोप झाला. भरत शाह यांचं नाव लागलेलं असतानाही हा आरोप झाला होता. हे प्रकरण २५ वर्षांपूर्वी बरंच गाजलं होतं. आता प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या चर्चांमागचं गुपित काय? नेमकं काय घडलं होतं ते सांगितलं आहे.

राम गोपाल वर्मांनी काय सांगितलं?

भरत शाह यांना कळलं की सलमान खानच्या डेट्स चित्रपटासाठी उपलब्ध आहेत. त्यांना एका मुलाने ही बाब सांगितली होती. पण त्या मुलाला चित्रपटसृष्टीची काहीही पार्श्वभूमी नव्हती, तसंच तो काही फार श्रीमंतही नव्हता. भरत शाह यांनी सलमान खानला फोन केला. राम गोपाल वर्मा यांचा दिल से हा देखील त्याच दरम्यान आला होता. चोरी चोरी चुपके चुपकेच्या वेळी काय घडलं होतं ते राम गोपाल वर्मांनी सांगितलं. सलमान खान भरत शाह यांना म्हणाला की हो मी त्या मुलाला डेट्स दिल्या आहेत. त्यानंतर मग भरत शाह निर्धास्त झाले. त्यांनी त्या मुलाला पैसे दिले आणि अशा पद्धतीने चोरी चोरी चुपके चुपके सिनेमा सुरु झाला. अशी आठवण राम गोपाल वर्मांनी सांगितली.

Director Ram Gopal Varma
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी काय सांगितलं?

नझिम रिझवीचे छोटा शकीलशी संबंध होते

हा मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून नझिम रिझवी होता. काही काळ गेल्यानंतर हे समोर आलं की नझिम रिझवीचे छोटा शकिलशी संबंथ आहेत. पण भरत शाह यांना वाटलं की नझिम जे काही करतोय ते कायदेशीर आहे. शिवाय त्याचे संबंध जर का अंडरवर्ल्डशी असतील तरीही त्याचा चित्रपटाशी काय संबंध असंही भरात शाह यांना वाटलं, शिवाय नझिम काही गु्न्हेगार नव्हता. पण तो छोटा शकीलसारख्या कुख्यात गुंडाशी संबंध ठेवून होता अशी माहिती राम गोपाल वर्मांनी हुसैन जैदी यांच्या पॉडकास्टमध्ये दिली.

एकाला पाच कोटींची खंडणी देण्याची धमकी आली आणि…

याच चित्रपटाबाबत बोलत असताना राम गोपाल वर्मा पुढे म्हणाले की त्याच काळात सिनेव्यवसायात असलेल्या एका व्यावसायिकाला पाच कोटींची खंडणी हवी आहे अशी धमकी देणारा फोन आला. त्याचं नाव राम गोपाल वर्मांनी सांगितलं नाही, पण त्यांनी हे सांगितलं की तो व्यावसायिक भरत शाह यांच्याकडे आला आणि मदत मागू लागला. त्यावेळी शाह यांनी नझिम रिझवीकडे मदत मागितली. कारण त्याचे संबंध छोटा शकीलशी आहेत हे त्यांना समजलं होतं. त्यानंतर शकीलला जेव्हा फोन केला गेला तेव्हा खंडणीची रक्कम २ कोटी रुपयांवर आली. मात्र खंडणीचे आलेले हे फोन, त्यानंतर झालेली सेटलमेंट सगळं काही समोर येत होतं त्यावेळी पोलीस काही लोकांचे फोन टॅप करत होते. भरत शाह यांच्यावर त्यावेळी असाही आरोप झाला की तुम्ही शकीलसाठी काम करत आहात. शकील तुमच्यासाठी काम करतो आहे. पण भरत शाह म्हणाले की मी त्याला ओळखतही नाही, मी फक्त सिनेनिर्माता आहे. पण या सगळ्या प्रकरणात भरत शाह आणि नझिम रिझवी यांना २००१ मध्ये अटक झाली. प्रकरण न्यायालयात गेलं तोपर्यंत १४ महिने उलटले होते. भरत शाह यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली पण त्यांनी १४ महिने तुरुंगात आधीच काढले होते त्यामुळे त्यांना सोडण्यात आलं. पण नझिम रिझवी, त्याचा पार्टनर अब्दुल रहिम खान यांना सहा वर्षांची शिक्षा झाली आणि प्रत्येकी १५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला. कारण त्यांचं आणि अंडरवर्ल्डचं कनेक्शन समोर आलं होतं. अशीही आठवण राम गोपाल वर्मांनी सांगितली.

Chori Chori Chupake Chupake Movie
चोरी चोरी चुपके चुपके हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. (फोटो-सोशल मीडिया)

भरत शाह कोण होते?

भरत शाह हे हिरे व्यापारी होते आणि त्या काळी ते मुंबईतल्या श्रीमंतांपैकी एक होते. यशराज फिल्मस, धर्मा प्रॉडक्शन्स, शाहरुख खानची ड्रीम्ज अनलिमिटेड या कंपन्यांचे ते प्रमुख फायनान्सर होते. १९९३ मध्ये आलेला डर, अझिझ मिर्झा यांचा येस बॉस, मणिरत्नम यांचा दिल से, राजकुमार संतोषी यांचा पुकार, संजय लीला भन्साळींचा देवदास अशा चित्रपटांसाठी भरत शाह हे सहनिर्माते होते.

मुकेश दुग्गलवर गोळीबार आणि हत्या

राम गोपाल वर्मा यांनी पॉडकास्टमध्ये मुकेश दुग्गलवर झालेल्या गोळीबारावरही भाष्य केलं. मुकेश दुग्गल हा दाऊदच्या जवळचा होता. त्यावेळी छोटा शकील आणि दाऊद यांच्यात सख्य होतं. दाऊद आणि छोटा शकील यांच्यासह मुकेश दुग्गल ड्रिंक्सही घ्यायचा. शकीलवर तो अनेकदा चिडायचा कारण शकील ड्रींक चांगलं बनवायचा नाही. शकील आणि दाऊद यांच्यात शत्रुत्व निर्माण झालं तेव्हा मुकेश दुग्गल सिनेसृष्टीत आला. तो या ठिकाणी फक्त कायदेशीर गोष्टीच करायचा. एका मालमत्तेवरुन छोटा शकील आणि मुकेश दुग्गलचा वाद झाला. ज्यानंतर दुग्गल दाऊदकडे गेला होता. दाऊदने दोघांची समजूत घातली. त्याने शकीलला फोन केला आणि सांगितलं आपण सगळे एक आहोत. त्यानंतरकाही तासांमध्ये मुकेश दुग्गलचा मृतदेह सापडला होता अशी आठवण राम गोपाल वर्मांनी या पॉडकास्टमध्ये सांगितली.