90s Bollywood & Underworld: प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ९० च्या दशकातील बॉलीवूडच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हा तो काळ होता जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीवर मुंबईतील अंडरवर्ल्डचा मोठा प्रभाव होता. खंडणीसाठी येणारे फोन, परदेशातील पैसा आणि अमूक एका कलाकारांनाच कास्ट करा, यासाठी येणारा दबाव या गोष्टींचा संबंध दाऊद इब्राहिमसारख्या लोकांशी जोडला जात असे. राकेश रोशन आणि गुलशन कुमार यांसारखी मोठी व्यक्तिमत्त्वे अंडरवर्ल्डच्या निशाण्यावर का आली, याचा खुलासा राम गोपाल वर्मा यांनी केला आहे.

लेखक हुसेन झैदी यांच्याशी बोलताना बोलताना वर्मा म्हणाले की अंडरवर्ल्डची रणनीती फक्त हिंसाचार करणं ही नव्हती, तर ती जाणीवपूर्वक निर्माण केलेली दहशत होती. “जेव्हा अंडरवर्ल्डला आपली ताकद दाखवायची असते, तेव्हा ते काय करतात? ते राकेश रोशन, सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या मोठ्या नावांना टार्गेट करतात.” अनेकदा हे गँगस्टर्स स्वतःला एखाद्या चित्रपटातील एखाद्या पात्राप्रमाणे खूप मोठे समजत असत, असंही वर्मांनी सांगितलं.

हृतिक रोशनच्या तारखा मागितल्या होत्या

वर्मा यांच्या मते, हे फक्त पैशांसाठी नव्हतं, तर आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी होतं. ते म्हणाले, “स्वत:ला हिरो सिद्ध करण्यासाठी त्यांना आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीवर मात करावी लागते. हे मोठे स्टार्स आहेत, तुम्हाला सहजासहजी हृतिक रोशनच्या तारखा मिळवू शकत नाही. त्यामुळे ते भीती निर्माण करतात. जर या स्टारने नकार दिला, तर काय होईल? असा त्यामागचा विचार असा असतो.”

स्टार्सना धमक्या यायच्या, या धमक्यांमागे नेमका कोणाचा हात आहे… छोटा शकील, दाऊद इब्राहिमचं नेटवर्क की इतर कोणी, याबाबत त्यावेळी बराच संभ्रम असायचा, असंही वर्मांनी स्पष्ट केलं. “अनेक लोक गँगस्टर्सच्या मागण्यांपुढे झुकत नव्हते, त्यामुळे त्यांना एक उदाहरण उभं करायचं होतं. ‘बघा त्याचं काय झालं, तुमच्याबरोबरही तेच होऊ शकतं.’ अंडरवर्ल्डमध्ये एक म्हण आहे- ‘एकाची हत्या करा आणि दहा जणांकडून खंडणी उकळा.’”

राकेश रोशन यांच्यावरील गोळीबार

राम गोपाल वर्मा यांनी या दहशतीच्या वातावरणाचा थेट संबंध जानेवारी २००० मध्ये राकेश रोशन यांच्यावर झालेल्या गोळीबाराशी जोडला आहे. ‘कहो ना… प्यार है’ चित्रपट यशस्वी झाल्यानंतर लगेचच ही घटना घडली होती.

वर्मा यांनी असा दावा केला की, “त्यांना हृतिक रोशनच्या तारखा हव्या होत्या. त्यांचा प्लॅन असा होता की, एक चित्रपट तयार करायचा ज्यामध्ये लोकांसमोर दाखवायला एखादं नाव असेल, पण पडद्यामागून सर्व सूत्रे छोटा शकील हलवेल. राकेश रोशन यांनी या गोष्टीला विरोध केला आणि म्हणूनच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या,” असा दावा राम गोपाल वर्मा यांनी केला.

राकेश रोशन काय म्हणाले होते?

२१ जानेवारी २००० रोजी राकेश रोशन यांच्या ऑफिसबाहेर त्यांच्यावर हल्ला झाला होता. हा हल्ला अंडरवर्ल्डच्या दबावामुळे झाला होता, असं म्हटलं जातं. राकेश रोशन या हल्ल्यातून बचावले होते. हृतिकच्या ‘डेट्स’ एका चित्रपटासाठी देण्यासाठी अंडरवर्ल्डकडून येत असलेल्या दबावाची आठवण राकेश रोशन यांनी २०२५ मध्ये ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. “हृतिक त्यांच्यासाठी चित्रपट करेल, असे संकेत मी कधीच दिले नाहीत. मी हृतिककडे तारखा नाहीत असं सांगून त्यांना टाळत होतो आणि तेच खरं होतं. त्यानंतर त्यांनी मला इतर निर्मात्यांशी बोलून तारखांची जुळवाजुळव करायला सांगितलं आणि मी पुन्हा त्यासाठी नकार दिला,” असं राकेश रोशन म्हणाले होते. तो काळ भीतीदायक होता, असंही त्यांनी सांगितलं होतं.

गुलशन कुमार यांचे हत्या प्रकरण

१२ ऑगस्ट १९९७ मध्ये गुलशन कुमार यांची हत्या झाली होती. मुंबईतील अंधेरीतील जीतेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडत असतानाच गुलशन कुमार यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. यातील मुख्य शूटर म्हणून मर्चेंटचे नाव समोर आले होते. मर्चेंट अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा जवळचा साथीदार आणि प्रशिक्षित शार्प शूटर असल्याचे तपासादरम्यान समोर आले. सालेमच्या टोळीने खंडणी मागितल्यानंतर कुमार यांनी नकार दिला होता. त्यामुळे त्यांची हत्या केली होती.