Ram Gopal Varma and Urmila Matondkar relationship Controversy : राम गोपाल वर्मा बॉलीवूडमधील अशा दिग्दर्शकांपैकी एक आहेत ज्यांनी त्यांच्या चित्रपटांमुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ते सात एप्रिल रोजी त्यांचा ६४वा वाढदिवस साजरा करणार आहेत. राम गोपाल वर्मा त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असायचे.
माध्यमांच्या वृत्तानुसार अनेक लोकप्रिय अभिनेत्रींबरोबर राम गोपाल वर्मा यांचं नाव जोडलं गेलं. पण, उर्मिला मातोंडकरच्या नावाची अधिक चर्चा झाली. असंही म्हटलं जातं की राम गोपाल वर्मा यांच्यामुळेच उर्मिला मातोंडकरला लोकप्रियता मिळाली. राम गोपाल वर्मा यांनी ‘शिवा’ या दाक्षिणात्य चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली आणि ‘रंगीला’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला. यामध्ये अभिनेता आमिर खान व उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकांमध्ये होते. यानंतर राम गोपाल वर्मा व उर्मिला मातोंडकर यांनी एकत्र काम करत अनेक हिट चित्रपट दिले. ज्यामध्ये ‘दौड’, ‘सत्या’ आणि ‘प्यार तूने क्या किया’ या चित्रपटांचा समावेश आहे. या हिट चित्रपटांमुळे राम गोपाल वर्मा यांचा बॉलीवूडमधील सुपरहिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांच्या यादीत समावेश झाला. तर उर्मिला मातोंडकरसुद्धा बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनली होती.
११ वर्षांनी लहान उर्मिलाच्या प्रेमात होते राम गोपाल वर्मा?
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार ‘रंगीला’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान उर्मिला मातोंडकर व राम गोपाल वर्मा यांच्यामध्ये जवळीक वाढल्याचं म्हटलं जातं. विवाहित असतानाही रामगोपाल वर्मा ११ वर्षांनी लहान उर्मिलाच्या प्रेमात होते असं म्हटलं जातं. असंही म्हटलं जातं की जेव्हा ही गोष्ट राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीला कळली तेव्हा त्यांचा संताप झाला होता.
राम गोपाल वर्मा यांच्या पत्नी रत्ना इतक्या संतापल्या होत्या की त्यांनी उर्मिलाच्या कानाखाली मारली होती. या घटनेनंतरच राम गोपाल वर्मा व रत्ना यांचा घटस्फोटही झाल्याच्या चर्चा आहेत. यानंतर करिअर वाचवण्यासाठी उर्मिलानेही यामधून बाहेर पडल्याचं म्हटलं जातं.
राम गोपाल वर्मा यांनी केलेलं उर्मिला मातोंडकरचं कौतुक
‘एबीपी’च्या वृत्तानुसार एका मुलाखतीत राम गोपाल वर्मा उर्मिलाबद्दल म्हणालेले, “मला असं वाटतं की उर्मिला खूप उत्तम अभिनेत्री आहे आणि म्हणूनच मी इतक्या चित्रपटांमध्ये तिच्याबरोबर काम केलं आहे.”
