Mandakini New Look : राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेला आणि १९८५ साली प्रदर्शित झालेला ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट गाजला होता. चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यामधील गंगा या पात्राने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी गंगा ही भूमिका लोकप्रिय अभिनेत्री मंदाकिनीने साकारली होती. मंदाकिनीच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यावेळी चित्रपटातील मंदाकिनीची भूमिका प्रचंड गाजली. मात्र, नंतर तिने सिनेविश्वापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. ३० वर्षांपासून बॉलीवूडपासून लांब असलेली मंदाकिनी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. मंदाकिनी सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांशी संवाद साधत असते. दरम्यान, मंदाकिनीने तिचा नवीन लूक शेअर केला आहे. तिचा हा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

६२ वर्षीय अभिनेत्री मंदाकिनी यांनी नुकताच आपला नवा लूक चाहत्यांसह शेअर केला आहे. तिने नवीन हेअरकट केला असून, ज्यामुळे ती पूर्णपणे वेगळी दिसत आहे. याचबरोबर मंदाकिनीने केस कलरसुद्धा केले आहेत. अभिनेत्री मंदाकिनी आपल्या मुलीसह सलूनमध्ये गेली होती. नव्या हेअरस्टाईलमध्ये तिने खास फोटो आणि व्हिडीओही शेअर केले आहेत.

तसेच ही रील शेअर करताना ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटातील लोकप्रिय ‘सुन साहिबा सुन’ हे गाणे लावले आहे. एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या मंदाकिनीचा हा लूक पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मंदाकिनीचा हा नवा अंदाज पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक करत जुन्या आठवणी जाग्या झाल्याचे कमेंट्समध्ये लिहिले आहे.

नेटकऱ्यांनी केले नव्या लूकचे कौतुक

मंदाकिनीने तिचे हेअरकट व हेअरस्टाईलचे फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘वाढणारे वय हे आपल्या हातामध्ये नसते, पण मंदाकिनी आधीही सुंदर होती आणि आजही सुंदर आहे.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘हे गाणे माझ्या मनात नेहमीच खास म्हणून राहिले आहे.’ आणखी एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘तू अजूनही माझी आवडती अभिनेत्री आहेस.’ मंदाकिनीच्या एका चाहत्याने सिडनीहून तिच्यासाठी कमेंट करत, ‘तू माझी लहानपणीची क्रश आहे,’ असे लिहिले आहे.

मंदाकिनीने एकेकाळी गाजवले बॉलीवूड

मंदाकिनीचे खरे नाव यास्मिन जोसेफ आहे. ८० च्या दशकातील लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्रींपैकी ती एक मानली जात होती. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील गंगा ही भूमिका आजही सर्वात गाजलेली भूमिका मानली जाते. यानंतर तिने ‘प्यार करके देखो’, ‘लोहा’, ‘कंमाडो’ आणि ‘तेजाब’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यानंतर अभिनेत्री मंदाकिनीचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी जोडले गेले होते. मात्र, मंदाकिनीने हे संबंध नेहमीच नाकारले होते. मंदाकिनी यांनी डॉ. काग्यूर टी. रिनपोछे ठाकूर यांच्याशी विवाह केला आणि चित्रपटसृष्टीपासून दूर राहणे पसंत केले.