रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यादरम्यान टेलिव्हिजनवरील रमानंद सागर यांची सुपरहिट मालिका ‘रामायण’चीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अनेक जण ‘रामायण’ चित्रपटाची मालिकेशी, त्यातील कलाकारांशी तुलना करत आहेत. यादरम्यान मालिकेतील कलाकार पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी दिवंगत अभिनेत्री उर्मिला भट्टही चर्चेत आल्या आहेत. त्यांनी मालिकेत सुनयना हे पात्र साकारलं होतं. परंतु, अनेकांना माहीत नसेल की उर्मिला भट्ट यांची हत्या झाली होती आणि इंडस्ट्रीतील सर्वात वाईट घटनांपैकी ही एक मानली जाते.
चित्रपटसृष्टीच्या झगमगाटामागे अनेक वेदनादायी आणि धक्कादायक घटना दडलेल्या आहेत. त्यापैकी काही आजही अनुत्तरित रहस्य म्हणून चर्चेत आहेत. जनसत्ताच्या वृत्तानुसार रामानंद सागर यांच्या गाजलेल्या ‘रामायण’ मालिकेत सीतेची आई सुनयनाची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उर्मिला भट्ट यांच्या हत्येचं गूढही असंच एक प्रकरण आहे. त्यांच्या हत्येमागचं नेमकं सत्य आजपर्यंत समोर आलेलं नाही.
‘रामायण’ मालिकेत सुनयना ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उर्मिला भट्ट यांना जितकं यश मिळालं तितकाच त्यांचा शेवट धक्कादायक आणि वेदनादायी ठरला. १९९७ मध्ये त्यांची निर्घृण हत्या झाली होती. या घटनेने चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. उर्मिला भट्ट यांचा जन्म १९३४ मध्ये उत्तराखंडमधील देहरादून येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा कल रंगभूमी आणि संगीताकडे वाढला. अभिनयाची आवड जोपासण्यासाठी त्या पुढे राजकोट येथे गेल्या आणि रंगभूमीवर काम केलं. सुरुवातीला त्यांनी लोकगायिका आणि नृत्यांगना म्हणून काम करायला सुरू केलं. त्यानंतर त्यांना चित्रपटांमध्ये संधी मिळू लागली आणि अभिनय क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत उर्मिला भट्ट यांनी हिंदी, गुजराती चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारल्या. छोट्या पडद्यावरही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘रामायण’ मालिकेतील सुनयना यांच्या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. याशिवाय अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आई आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या. धर्मेंद्र यांच्या ‘पापी देवता’ (१९९५) हा त्यांचा अखेरचा चित्रपट मानला जातो.
उर्मिला भट्ट यांची हत्या कशी झाली?
उर्मिला भट्ट त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही सुखी होत्या. त्यांचं लग्न गुजराती रंगभूमीवरील अभिनेते मकरंद भट्ट यांच्याशी झालं होतं. या दाम्पत्याला दोन मुलं आणि एक मुलगी होती. त्यांचं आयुष्य सुरळीत सुरू होतं. मात्र, २२ फेब्रुवारी १९९७ हा दिवस त्यांच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरला. त्या दिवशी उर्मिला भट्ट घरी एकट्याच होत्या. बराच वेळ झाला तरी त्यांनी दरवाजा उघडला नाही, त्यामुळे त्यांच्या जावयाला संशय आला. शेजाऱ्यांनीही सांगितलं की, सकाळी घरकामासाठी आलेली महिला दरवाजा न उघडल्यामुळे परत गेली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी कसाबसा घरात प्रवेश केला आणि समोरचं दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला.
घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं आणि उर्मिला भट्ट यांचा मृतदेह रक्तबंबाळ झालेला आढळला. सुरुवातील तपासात समोर आलं की, अज्ञात हल्लेखोरांनी आधी त्यांचे हात-पाय दोरीने बांधले आणि त्यानंतर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्यांची हत्या केली. घरातील दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूही गायब असल्याने हा प्रकार चोरीच्या उद्देशाने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास केला आणि अनेकांची चौकशीही केली. मात्र, आरोपींबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. त्यामुळे आजही यामागचं कारण स्पष्ट झालं नसून, उर्मिला भट्ट यांच्या हत्येचं प्रकरण बॉलिवूडमधील सर्वात गूढ आणि चर्चित प्रकरणांपैकी एक म्हणून केली जाते.
यानंतर अभिनेत्री तबस्सुम यांनी त्यांच्या ‘तबस्सुम टॉकीज’ या कार्यक्रमात या घटनेचा उल्लेख केला होता. त्यांनी सांगितलं होतं की, हल्लेखोर घरातील दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरुन घेऊन गेले होते. तसेच, उर्मिला भट्ट यांना दोरीने बांधल्यानंतर त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
