Ramayana Trailer Reaction : बॉलीवूड दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुप्रतिक्षित ‘रामायण : पार्ट १’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमामध्ये अभिनेता रणबीर कपूर प्रभू रामांची मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. तर अभिनेत्री साई पल्लवी ही माता सीता आणि दाक्षिणात्य स्टार यश हा रावणाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांमध्ये याची चर्चा आहे. मात्र सोशल मीडियावर रणबीर कपूरची रामांच्या भूमिकेतील निवड आणि कलाकारांची आधुनिक वेशभूषा यावरून नेटकऱ्यांनी टीका केली. यानंतर आता दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माते रामानंद सागर यांचे नातू शिव सागर यांनी रामायण चित्रपटाच्या ट्रेलरबाबत त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

१९८७ साली ‘रामायण’ या दूरदर्शन मालिकेतून दिग्दर्शक रामानंद सागर यांनी प्रभू रामांची कथा घराघरात पोहोचवली. त्यांच्या ‘रामायण’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं. आजही ही मालिका आणि त्यातील प्रसंग तेवढ्याच आवडीने पाहिले जातात. रामानंद सागर हे आपल्यात नसले तरी त्यांनी निर्माण केलेल्या रामायण मालिकेची आठवण आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये कायम आहे. याच रामानंद सागर यांचे नातू शिव सागर यांनी नितेश तिवारी यांच्या रामायणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चित्रपटातील व्हीएफएक्सचं कौतुक केलं असून, यश आणि साई पल्लवी यांच्या कास्टिंगचं कौतुक केलं आहे. मात्र, प्रभू रामांच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरची निवड त्यांना विशेष पटली नसल्याचं मत शिव सागर यांनी व्यक्त केलं.

काय म्हणाले शिव सागर?

‘टूथ माउंटन फार्म्स’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शिव सागर यांनी ‘रामायण’ चित्रपटाबाबत त्यांचं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, “मी ट्रेलर पाहिला. अर्थात, प्रोमोपेक्षा ट्रेलर खूपच चांगला होता. कारण याआधी जो टीझर प्रदर्शित झाला होता, त्यामध्ये फारशी माहिती नव्हती. पण ट्रेलरमध्ये कलाकार, व्हीएफएक्स आणि यश साकारत असलेला रावण अधिक चांगल्या प्रकारे दिसून आले आहेत.”

दक्षिणात्य कलाकारांना पौराणिक कथांची जाण – शिव सागर

यश आणि साई पल्लवी यांच्या भूमिकांबद्दल बोलताना ते म्हणाले, “एकूणच मला रावणच्या भूमिकेत यश आणि सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी यांची निवड खूप आवडली. कारण ते दोघेही दक्षिण भारतातील आहेत. दक्षिणात्य कलाकारांना पौराणिक कथा चांगल्या प्रकारे समजतात. लहानपणापासून त्यांच्या आजी-आजोबांनी त्यांना या कथा सांगितलेल्या असतात. त्यामुळे त्या पात्रांची देहबोली आणि स्वभाव त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असतो. म्हणूनच यश आणि साई पल्लवी यांनी उत्तम प्रकारे भूमिका साकारल्या असून प्रभावी अभिनय केला आहे. मात्र, इतर कलाकारांबाबत मला तसं वाटलं नाही.”

रणबीर कपूरच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करताना शिव सागर म्हणाले, “साधारणपणे भगवान राम यांच्यासारख्या भूमिकेसाठी आपण नवीन चेहऱ्याची निवड करतो. रणबीर कपूरची आधीपासून एक वेगळी प्रतिमा आहे, विशेषतः ‘अॅनिमल’ चित्रपटानंतर, त्याची वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. यामुळे तो भगवान राम यांच्या भूमिकेत प्रेक्षकांना कितपत स्वीकारला जाईल, याबाबत मला शंका आहे. मात्र, चित्रपटातील व्हीएफएक्स खूपच उत्कृष्ट आहेत. नितेश तिवारी यांनी ही संकल्पना अतिशय सुंदर पद्धतीने साकारली आहे.”

याचबरोबर रामानंद सागर यांचे नातू शिव सागर यांनी रावणाच्या पुष्पक विमानाची संकल्पना आणि सिंहाच्या रथावरून येणाऱ्या शूर्पणखेचंही कौतुक केलं. ‘हा चित्रपट यशस्वी ठरावा आणि त्यामुळे नव्या पिढीमध्ये भारतीय पौराणिक कथांविषयी उत्सुकता निर्माण व्हावी,’ अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

‘रामायण’ कधी होणार रिलीज?

दरम्यान, नमित मल्होत्रा यांच्या महत्त्वाकांक्षी ‘रामायण’ सिनेमाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून, दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी रणबीर कपूरच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच पात्रांच्या वेशभुषेवरून जोरदार टीका होत आहे. याचबरोबर श्री रामलीला महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. निर्मात्यांनी रिलीजपूर्वी ‘रामायण’चे विशेष स्क्रीनिंग आयोजित न केल्यास सिनेमागृहाबाहेर निदर्शनं आणि आंदोलन करण्याचा इशारा श्री रामलीला महासंघाने दिला आहे. ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांत येणारा असून पहिला भाग या वर्षी दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे. तर दुसरा भाग हा पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.