Ramayana Teaser Out : ‘रामायण’ सिनेमाची पहिली झलक, रणबीरचा या सिनेमातील लूक केव्हा पाहायला मिळणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हनुमान जयंतीचं औचित्य साधून निर्मात्यांनी ‘रामायण’ चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित केला आहे. या बिग बजेट ऐतिहासिक सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. प्रेक्षकांना दोन भागांमध्ये हा सिनेमा पाहायला मिळणार आहे.
बॉलीवूड सुपरस्टार रणबीर कपूरचा या सिनेमातील लूक नेमका कसा असणार याबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. यापूर्वी त्याचे सेटवरचे बरेच फोटो लीक झाले होते. पण, ते सगळे फोटो ब्लर होते. अखेर आता टीझर प्रदर्शित झाल्यावर रणबीरचा पहिला लूक अधिकृतरित्या समोर आला आहे. ‘रामायण’ चित्रपटाच्या पहिल्या टीझरला ‘रामा’ असं नाव देण्यात आलं आहे. रणबीरच्या डोळ्यांतील तेज, त्याचा स्क्रीन प्रेझेन्स नेहमीप्रमाणे कमाल आहे. रणबीर शांत, संयमी रुपात पाहायला मिळतोय. राजा दशरथांकडून श्रीरामांना जेव्हा वनवासाची आज्ञा मिळाली, तो प्रसंग सुद्धा टीझरमध्ये पाहायला मिळतो.
‘रामायण’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित
याशिवाय, टीझरच्या अगदी शेवटी प्रभु श्रीरामांसह, सीता माता आणि लक्ष्मणाची झलक पाहायला मिळतेय. रणबीरने गेली दोन ते तीन वर्षे या सिनेमासाठी जी काही मेहनत घेतलीये ती पहिल्याच टीझरमध्ये अगदी स्पष्टपणे पाहायला मिळतेय. आठ वेळा ऑस्कर पुरस्कार विजेता व्हिज्युअल इफेक्ट्स स्टुडिओ DNEG आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहकार्याने हा भव्यदिव्य चित्रपट साकारण्यात आला आहे.
‘रामायण’ चित्रपटाच्या सेटची भव्यदिव्य झलक सुद्धा यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. भव्यदिव्य सेट, व्हिज्युअल इफेक्ट्स, जबरदस्त VFX, पुष्पक विमानाची झलक सर्वांचं लक्ष वेधून घेते.
नेटकऱ्यांनी या टीझरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “किती सुंदर आहे हा टीझर”, “आदिपुरुषनंतर जो काही अपेक्षाभंग झाला होता…त्यामुळे हा रामायण सिनेमा येणं फार गरजेचं होतं”, “याला म्हणतात टीझर”, “रणबीर कपूरने खरंच खूप मेहनत घेतलीये ते स्पष्टपणे जाणवतंय”, “अंगावर काटा आला”, “रणबीर कपूर बेस्ट आहे खरंच”, “हा मुव्ही ब्लॉकबस्टर ठरणार यात शंका नाही” अशा असंख्य प्रतिक्रिया या टीझरवर आल्या आहेत.
दरम्यान, ‘रामायण’ हा हिंदी सिनेविश्वातील आतापर्यंतचा बिग बजेट सिनेमा असणार आहे. या सिनेमाच्या दोन्ही भागांचं बजेट जवळपास ४ हजार कोटी असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे. ‘रामायण’मध्ये रणबीर कपूरसह साई पल्लवी, यश, सनी देओल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंह हे कलाकार झळकणार आहेत.
