Adinath Kothare Talks About Ramayana : बॉलीवूडमधील बहुचर्चित चित्रपट ‘रामायण’ २०२६मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, साई पल्लवी सितेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत झळकणार आहे. अशातच आता यामध्ये भरत हे पात्र साकारणारा मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारेने या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने रणबीर कपूरचं कौतुक केलं आहे.

आदिनाथ कोठारे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटात, मालिकेत आणि सीरिजमध्ये काम केलं आहे. अलीकडेच त्याच्या ‘नशीबवान’ मालिकेने निरोप घेतला. त्यानंतर त्याची ‘डिटेक्टव्ह धनंजय रहस्यजाल’ ही सीरिज प्रदर्शित झाली. त्याचबरोबर त्याचा ‘सिस्टम’ हा हिंदी कोर्टरूम ड्रामा चित्रपटही चर्चेत आहे. आता येत्या काळातही अभिनेता असाच एका वेगळ्या भूमिकेतून झळकणार आहे.

रामायणबद्दल काय म्हणाला आदिनाथ?

आदिनाथ कोठारे नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात प्रभू श्रीरामांच्या भावाच्या भरतच्या भूमिकेतून झळकणार आहे. अशातच आता Variety Indiaला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितलं आहे. अभिनेता म्हणाला, “मला भारतातील इतक्या मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळत आहे यासाठी मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो. खूप चांगल्या टीमबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली आहे.”

आदिनाथने केलं रणबीर कपूरचं कौतुक

रणबीर कपूरबरोबर स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव सांगत आदिनाथ म्हणाला, “तो खूप मेहनती, शिस्तप्रिय आणि खरा अभिनेता आहे. त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूप छान आहे.” आदिनाथने पुढे चित्रपट प्रेक्षकांना आवडणार आहे याची त्याला खात्री असल्याचं सांगितलं आहे. तो म्हणाला, “मला खात्री आहे की प्रेक्षकांना रामायण आवडणार आहे. कारण – मला असं वाटतं की खूप खऱ्या भावनेने हा चित्रपट बनवण्यात आला आहे आणि मी आतापर्यंत वाचलेली उत्तम संहिता आहे.”

‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग यंदाच्या नोव्हेंबरमध्ये थिएटरमध्ये येणार असून, दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तब्बल १० हजारांहून अधिक लोक या चित्रपटावर काम करत असून, भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वात मोठा क्रू असलेला चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे.