Ramayana Movie Review and Release : रावणाच्या चेहऱ्यावरचं विजयी हास्य, हतबल झालेली सीता त्याचेवळी अचानक पुष्पक विमानाच्या दिशेने येणारा पक्ष्यांचा थवा अन् याचं नेतृत्व करणारा जटायू! जटायूचं येणं हा, सीतेसाठीचा आशेचा पहिला किरण…सीतेच्या मनातली आर्त हाक त्याने ऐकली होती. वृद्ध असूनही तो शेवटपर्यंत लढला पण, बलाढ्य रावणासमोर त्याचा पराभव झाला. खरंतर, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमा का पाहावा? याचं उत्तर इथेच मिळतं. हा सीन प्रेक्षक रामायणाचा दुसरा भाग येईपर्यंत विसरणं तरी अशक्यच! रावणाने पंख छाटल्यावर वेदनेनं विव्हळणाऱ्या जटायूची जीभ, त्याचा आवाज, रक्ताच्या थारोळ्यात त्याचं जमिनीवर कोसळणं हे प्रसंग मनाचा ठाव घेतात आणि भारतीय सिनेमात पहिल्यांदाच काहीतरी अद्भुत, ऐतिहासिक घडतंय याची साक्ष देतात.

रामायण चित्रपटाची घोषणा होताच… माहिती असलेली कथा, तिच गोष्ट आम्ही रुपेरी पडद्यावर पुन्हा का पाहावी? असा एक सूर उमटला होता. त्यात प्रेक्षक ‘आदिपुरुष’च्या ट्रॉमातून पुरते बाहेर आलेले नव्हते. त्यामुळे ४ हजार कोटींच्या सिनेमात वेगळं काय असणार असा प्रश्न साहजिक उपस्थित होतो आणि इथेच नितेश तिवारींनी लिखानातून पडद्यामागचं पहिलं युद्ध जिंकलं होतं. कारण, सिनेमाची सुरुवात होते दशाननच्या बालपणापासून, त्याने आईला दिलेलं वचन, त्यानंतर केलेली कठोर तपश्चर्या…त्याचा लंकाधिपती होण्याचा प्रवास…तर, दुसरीकडे भगवान विष्णूचा सातवा अवतार, प्रभू श्रीरामाचा जन्म, अयोध्या नगरीचा इतिहास ही पार्श्वभूमी अगदी नेटकेपणाने मांडण्यात आली आहे. यासह दशरथ-राम यांच्यातील संवाद, वनवासाला निघण्यापूर्वी रामने कैकेयीचा घेतलेला आशीर्वाद, अयोध्यावासियांना संबोधित करणं, राम-सीता यांच्यातील भावनिक संवाद शेवटपर्यंत लक्षात राहतात.

सिनेमाचा पहिला भाग, त्यातही सुरुवातीचा अर्धा तास पूर्णपणे ‘यश’मय आहे. टीझर-ट्रेलर पाहिल्यावरच रावणाची भूमिका साकारणारा रॉकी भाई म्हणजेच लोकप्रिय अभिनेता यश भाव खाऊन जाणार हे निश्चित होतं आणि अपेक्षेप्रमाणे त्याने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. रणबीर आणि साई पल्लवीपेक्षा रवी दुबेचं ( लक्ष्मण ) कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याच्यातला संयम, डायलॉग म्हणण्याची पद्धत, अवखळपणा…एकंदर रवीचा स्क्रीन प्रेझेन्स कमाल आहे. विशेषत: जटायूला अग्नी देताना रवी दुबेचे डोळे रणबीरपेक्षाही खूप काही सांगून जातात.

रकुल प्रीतने साकारलेली शूर्पणखा आणि विवेक ओबेरॉयने साकारलेला विद्युतजीव यांनाही दुर्लक्षित करून चालणार नाही. शीबा चड्ढा यांनी साकारलेल्या मंथराची भूमिका लहान असली तरीही उल्लेखनीय आहे. यासह सिनेमात मराठी कलाकारांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. आदिनाथ कोठारे, अजिंक्य देव यांच्या भूमिका, संवाद प्रभावी ठरतात.

‘रामायण’ सिनेमा का पाहावा?

‘रामायण’ सिनेमा कसा आहे याचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर, ‘Visually Every Frame Is Perfect’! त्रेतायुगाचा काळ, राक्षस, रावणाची लंका, अयोध्या नगरी, प्रभू श्रीरामांचं पहिलं युद्ध, राम-सीता-लक्ष्मण यांचा वनवासातील काळ हे प्रसंग स्क्रीनवर अद्भूतरित्या साकारण्यात आले आहेत. भारतीये सिनेमामध्ये अशा दर्जाचे VFX यापूर्वी क्वचितच पाहायला मिळाले असतील. आधी या सिनेमाबद्दल बऱ्याच शंका होत्या. पण, सिनेमा पडद्यावर पाहताना आपण सहज गुंतून जातो.

काही उणीवा…

काही भावनिक संवादांमध्ये आपण प्रभू श्रीराम नाही तर रणबीरलाच पाहतोय असं वाटून जातं. याउलट, परशुरामाच्या भूमिकेत रणबीर आणखी प्रभावी वाटला. साई पल्लवीला Accent मुळे जाणून मोजकेच डायलॉग दिले असल्याचं प्रकर्षाने जाणवतं. तिला सीतेच्या भूमिकेत जुळवून घेताना थोडा वेळ लागतो. याशिवाय प्रभू श्रीरामांच्या मातोश्री कौसल्या या भूमिकेला विशेष स्क्रीनटाइम देण्यात आलेला नाहीये, इथे त्यांची भूमिकाही उलगडणं आवश्यक होतं. याउलट रावणाच्या आईचं पात्र अधिक प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे. मंदोदरीची भूमिकेला काही वाव नव्हता असं जाणवलं. बॅकग्राउंड साउंड वगळता..सिनेमातील म्युझिक विशेष लक्षात राहत नाही. पण, या पलीकडे जाऊन नेहमीपेक्षा वेगळा अन् Visually अद्भूत अनुभव घेण्यासाठी ‘रामायण’ थिएट्रिकल एक्सपेरियन्स आहे हे नक्की!