Ranbir Kapoor Ramayana Movie Controversy: बॉलीवूड दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील पात्रांच्या आधुनिक वेशभूषेवरून नेटकऱ्यांनी टीका केली. त्यानंतर आता श्री रामलीला महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. टी-सिरीज निर्मित ‘आदिपुरुष’ सिनेमातील वादाची आठवण करून देत महासंघाचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी निर्मात्यांना पत्र पाठवलं आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वी महासंघाच्या प्रतिनिधींसाठी विशेष शो आयोजित न केल्यास देशभरात निदर्शने करणार असं त्यांनी म्हटलं आहे.

निर्मात्यांनी रिलीजपूर्वी ‘रामायण’चे विशेष स्क्रीनिंग आयोजित न केल्यास सिनेमागृहाबाहेर निदर्शनं आणि आंदोलन करण्याचा इशारा श्री रामलीला महासंघाने दिला आहे. महासंघाचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी महासंघाच्या प्रतिनिधींसाठी चित्रपटाचा खास शो दाखवा, अशी विनंती करणारे अधिकृत पत्र निर्मात्यांना पाठवले आहे. या पत्रात अर्जुन कुमार यांनी टी-सिरीज निर्मित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून झालेल्या वादाचा उल्लेख केला आहे. प्रभास, कृती सेनॉन आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील सेट, कपडे आणि भाषेवरून मोठी टीका झाली होती.

आदिपुरुषमधील वादग्रस्त दृश्यांचा उल्लेख

सनातन धर्म आणि पारंपरिक रामलीला सादरीकरणाशी संबंधित लोकांनी ‘आदिपुरुष’मधील अनेक दृश्यांवर आक्षेप घेतला होता. यात सोन्याऐवजी काळ्या रंगाची लंका दाखवणं, तसेच रावण आणि त्याच्या सैन्याचे चित्रण पारंपरिक श्रद्धेशी जुळणारे नव्हते, या गोष्टींचा समावेश होता. अशा वादग्रस्त दृश्यांमुळे लोक भडकले होते आणि त्याचा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठा फटका बसला होता, असं अर्जुन कुमार यांनी पत्रात म्हटलंय.

‘रामायण’ चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी दृश्ये असू शकतात

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी दृश्ये असू शकतात, अशी माहिती मिळाल्याचा दावा महासंघाने केला आहे. त्यामुळे चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वी आक्षेपार्ह दृश्ये किंवा संवाद ओळखून ते हटवता यावेत, यासाठी सिनेमाचा विशेष शो दाखवण्याची मागणी संघटनेने केली आहे. निर्मात्यांनी ही विनंती मान्य न केल्यास श्री रामलीला महासंघ इतर हिंदू संघटनांबरोबर मिळून देशभरातील चित्रपटगृहाबाहेर आंदोलनं करेल, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवी दुबे, रकुल प्रीत सिंग, अरुण गोविल आणि लारा दत्ता यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. दोन भागांत येणारा हा चित्रपट या वर्षी दिवाळीत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे आणि त्याचा दुसरा भाग पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, ‘रामायण’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यातील पात्रांच्या वेशभुषेवरून जोरदार टीका होत आहे. कथानकाच्या काळाच्या मानाने कपडे खूपच आधुनिक वाटत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.