रामायण हा चित्रपट येत्या ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात प्रभू रामाची भूमिका अभिनेता रणबीर कपूरने साकारली आहे. तर सीतेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे. यश या दाक्षिणात्य अभिनेत्याने रावणाची भूमिका साकारली आहे. साई पल्लवीबाबत आता अभिनेते नितीश भारद्वाज यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले आहेत नितीश भारद्वाज?
ऐंशीच्या दशकात बी.आर. चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेली महाभारत ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका नितीश भारद्वाज यांनी साकारली होती. त्यांनी साकारलेली कृष्णाची भूमिका अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. नितीश भारद्वाज मंगल रंग आणि मै बासुरी साँस तू या गाण्याच्या ओळी पोस्ट केल्या आहेत. तसंच तुम्ही या ओळींच्या मध्ये काही वाचलंत का? त्यानंतर नितीश भारद्वाज म्हणाले आहेत की मला अपेक्षा आहे की भारतीय प्रेक्षक साई पल्लवीला सीतेच्या भूमिकेत स्वीकारतील आणि मला चित्रपटात तुलसीदास यांच्या चौपाई कुठेतरी ऐकायला मिळतील. तसंच मृदुंग आणि मंजिरा ऐकू येतील अशी अपेक्षा आहे. कारण रामायण हे भारतातील एक सर्वात जुनं महाकाव्य आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात वसलेलं हे महा काव्य आहे. कुणी या दोन ओळींमधल्या ओळी वाचू शकेल का? असंही त्यांनी म्हटलं आहे. नितीश भारद्वाज यांनी इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे.
दिवाळीच्या आधी प्रदर्शित होतोय रामायण पार्ट १
दिवाळीच्या आधी म्हणजेच ५ नोव्हेंबरला रामायण पार्ट १ प्रदर्शित होतो आहे. नितेश तिवारीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रामायण चित्रपटाचा दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलगु, कानडी आणि मल्याळम भाषांमध्ये संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला ए.आर. रहमान आणि हंस झिम्मेर यांनी संगीत दिलं आहे.News 18 ने हे वृत्त दिलं आहे. रामायण पार्ट १ या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणंही महत्त्वाचं आहे.
नितीश भारद्वाज यांनी साकारलेली कृष्णाची भूमिका घराघरांत पोहचली आहे. तसंच ते चक्रव्यूह नाटकातही कृष्णाची भूमिका अजूनही साकारत आहेत. ते सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय आहेत. तसंच ते भाजपाचे खासदारही होते. त्यांनी आता रामायण पार्ट १ चित्रपटावर आणि साई पल्लवीच्या भूमिकेबाबत भाष्य केलं आहे.
