Ranbir Kapoor Ramayana Part 1: बहुप्रतीक्षित ‘रामायण : पार्ट १’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ब्रह्ममुहूर्तावर या सिनेमाचा पाच भाषांमध्ये ट्रेलर रिलीज झाला असून सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याआधी अनेकदा रामायण या महाकथेवर आधारित सिनेमा व मालिका निर्माण झाल्या आहेत. यानंतर आता नमित मल्होत्रा यांचे रामायण कसे असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण सिनेमाच्या पहिल्या भागाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. प्रचंड चर्चेत असलेल्या या ट्रेलरचे अनेकांनी कौतुक केले आहे, तर काहींनी कास्टिंगबाबत नाराजी व्यक्त केली आहे. प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूरने त्याच्या भूमिकेबाबत मत मांडले आहे.
‘रामायण पार्ट १’ या सिनेमामध्ये रणबीर कपूर हा प्रभू रामांची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर साई पल्लवी ही सीता, तर दाक्षिणात्य स्टार यश हा रावण ही भूमिका साकारणार आहे. या सिनेमामध्ये व्हीएफएक्सचा जबरदस्त वापर करण्यात आला असून याच्या दमदार संवादाने लक्ष वेधले आहे. रणबीर कपूरने संयमाने साकारलेले प्रभू श्रीराम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. महाकाव्य असलेले रामायण हे नव्या आणि भव्य स्वरूपामध्ये मांडल्याने प्रेक्षकांनी रामायण टीमचे कौतुक केले आहे. मात्र, काही नेटकऱ्यांनी रणबीर कपूरची निवड आणि कलाकारांचे कपडे यावरून नाराजी व्यक्त केली आहे. यावर रणबीर कपूरने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
ही जबाबदारी मलाच का दिली जात आहे? – रणबीर
रामायण सिनेमाचे सॅन दिएगोमध्ये प्रमोशन करण्यात आले होते. यावेळी रणबीर कपूरने त्याच्या भूमिकेविषयी मत व्यक्त केले. यावेळी दिग्दर्शक नितेश तिवारी, निर्माता नमित मल्होत्रा आणि अभिनेता यश उपस्थित होते. प्रभू श्रीरामांच्या भूमिकेबाबत रणबीर कपूर म्हणाला, “ही भूमिका जेव्हा माझ्याकडे आली, तेव्हा माझ्या मनात पहिला एकच प्रश्न आला होता की मी या भूमिकेसाठी योग्य व्यक्ती आहे का? ही फक्त प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारणं नाही, तर त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची ही जबाबदारी मलाच का दिली जात आहे? असे प्रश्न मलाही सुरुवातीला पडले होते. पण, काही वेळातच मला या भूमिकेचं महत्त्व, जबाबदारी आणि निर्मात्यांचा हेतू समजला. चार हजार वर्षांपासून ही कथा आजही तितकीच अर्थपूर्ण आहे आणि लोकांच्या मनात कोरलेली आहे, त्यामुळे प्रभू श्रीरामांची भूमिका साकारण्यासाठी एखादा विशिष्ट अभिनेताच योग्य असतो, असे मला वाटत नाही.”
रणबीर पुढे म्हणाला, “प्रत्येकाच्या मनात प्रभू श्रीरामांची वेगळी प्रतिमा आहे, त्यामुळे कोणत्याही एका अभिनेत्याला सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणे शक्य नाही. यासाठी कोणताही एक निश्चित चेहरा नाही. कदाचित काहींना असं वाटेल की माझी निवड (कास्टिंग) चुकीची आहे, तर काही जण म्हणतील की ती योग्य आहे. पण खरी गोष्ट ही आहे की, प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी तोच अभिनेता योग्य ठरू शकतो, ज्याचा हेतू शुद्ध आहे आणि ज्याचा प्रभू श्रीरामाच्या प्रवासावर व व्यक्तिमत्त्वावर नितांत विश्वास व श्रद्धा आहे.”
यशने केले रणबीरच्या अभिनयाचे कौतुक
याच मुलाखतीत रावणाची भूमिका साकारणाऱ्या यशनेही रणबीरच्या अभिनयाचं कौतुक केलं. यश म्हणाला, “प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणं अजिबात सोपं नाही. रणबीर कपूरने ही भूमिका अप्रतिम पद्धतीने साकारली आहे. त्याने यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. ‘रामायण’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांना प्रभू श्रीरामांचं अत्यंत सुंदर, समर्पित आणि प्रभावी रुप पडद्यावर दिसून येईल, ज्यामध्ये निष्ठा आणि त्याग दिसून येईल.”
