Ranbir Kapoor Ramayana Part 1 Trailer: बहुप्रतीक्षित ‘रामायण: पार्ट १’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांचा महत्त्वाकांशी प्रकल्प असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेतील या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. ट्रेलरमधील भव्य लंका, अजिंक्य रावण आणि विराट रावणराज पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. त्याचबरोबर रणबीर कपूरची श्रीराम यांच्या भूमिकेतील एंट्री आणि शांत संयमी डायलॉग यामुळे ट्रेलरमध्ये रणबीर कपूरने लक्ष वेधले आहे. पण, याच ट्रेलरमध्ये रणबीर कपूर हा दुहेरी भूमिकेमध्ये दिसून आला आहे.

रामायण चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत आहे, तर साई पल्लवी माता सीताच्या भूमिकेत असून कन्नड स्टार यश हा रावणाची प्रभावी भूमिका साकारत आहे. याचबरोबर अरुण गोविल हे राजा दशरथ, लारा दत्ता – कैकेयी, अजिंक्य देव- ऋषी विश्वामित्र, कुणाल कपूर- भगवान इंद्र, रकुल प्रीत सिंह -शूर्पणखा आणि रवि दुबे हे लक्ष्मण यांची भूमिका साकारताना दिसत आहेत. यामध्ये रणबीर कपूर आणखी एक पात्र साकारणार आहे. रणबीर कपूरने ‘रामायण: पार्ट १’मध्ये परशुरामाचे पात्रदेखील साकारले आहे.

रणबीर कपूरची दुहेरी भूमिका

‘रामायण: पार्ट १’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून यामध्ये परशुराम पात्र दाखवण्यात आले आहे. परशुराम प्रभू रामांसमोर गुडघ्यावर बसून त्यांना ‘शारंग’ (विष्णूंचे दिव्य धनुष्य) अर्पण करताना दिसत आहे. यामध्ये रणबीर कपूरच परशुरामाची भूमिका साकारत असल्याचे चाहत्यांच्या लक्षात आले आहे. रणबीर कपूर हा राम आणि परशुराम या दुहेरी भूमिका साकारत असल्याचे दिसून आले आहे. या भूमिकेत तो अक्षरशः ओळखू न येण्याइतपत वेगळा दिसत आहे. एका ऋषीसारख्या दिसणाऱ्या परशुरामांचे रणबीर कपूरने पात्र साकारल्याचे दिसून आले आहे.

सप्त चिरंजीवींपैकी एक भगवान परशुराम

भगवान परशुराम हे हिंदू धर्मातील भगवान विष्णूंचे सहावे अवतार मानले जातात. त्यांना राम जामदग्न्य, भार्गवराम आणि वीरराम या नावांनीही ओळखलं जातं. पुराणांनुसार, अन्याय आणि अधर्माचा नाश करण्यासाठी त्यांनी पृथ्वीवर अवतार घेतला होता. परशु (कुऱ्हाड) हे त्यांचं प्रमुख अस्त्र असल्यामुळे त्यांना ‘परशुराम’ या नावानं ओळखलं जातं. हिंदू मान्यतेनुसार, भगवान परशुराम हे सप्त चिरंजीवींपैकी एक असून ते अमर असल्याची श्रद्धा आहे.

‘रामायण: पार्ट १’चा ट्रेलर रिलीज

नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण: पार्ट १’ सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून चित्रपटाची पटकथा पुरस्कारविजेते लेखक श्रीधर राघवन यांनी लिहिली आहे. ऑस्कर विजेते संगीतकार हॅन्स झिमर आणि ए. आर. रहमान यांनी संगीत दिले आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये व्हीएफएक्सचा दमदार वापर करण्यात आला आहे. ‘रामायण: पार्ट १’ सिनेमा नमित मल्होत्रांच्या प्राइम फोकस स्टुडिओज तसेच आठ वेळा ऑस्कर विजेत्या VFX स्टुडिओ DNEG यांची निर्मिती असलेला, यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. ‘रामायण: पार्ट १’ हा दिवाळी २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.