Ramayana Part 1 Trailer : बहुप्रतीक्षित ‘रामायण पार्ट १’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. नमित मल्होत्रा यांच्या महत्त्वाकांक्षी रामायणाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून, दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. पाच भाषांमध्ये ट्रेलर रिलीज झाला असून, सोशल मीडियावर सर्वत्र या सिनेमाची चर्चा सुरू आहे. रणबीर कपूरने प्रभू श्री राम, साई पल्लवीने सीता, तर यशने रावणाची प्रभावी भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये व्हीएफएक्सचा दमदारपणे वापर करण्यात आला असून, कलाकारांच्या लूकने सिनेमाची उत्सुकता वाढवली आहे. त्यामध्ये आणखी एका भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले आहे आणि ते म्हणजे ‘मंथरा’. शाहरुख खानसह स्क्रीन शेअर करीत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीने मंथरा ही भूमिका साकारली आहे.
अनेक दिवसांपासून ‘रामायण पार्ट १’ सिनेमामध्ये कोणकोणते कलाकार भूमिका साकारणार याची चर्चा रंगली होती. अनेक भूमिका आणि त्यातील कलाकार हे गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात आले होते. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या कलाकारांची झलक समोर आली आहे. रणबीर कपूर श्री रामांच्या, साई पल्लवी- माता सीता, यश- रावण, अरुण गोविल- दशरथ, लारा दत्ता- कैकयी, अजिंक्य देव- ऋषी विश्वामित्र, कुणाल कपूर- भगवान इंद्र, रकुल प्रीत सिंह- शूर्पणखा व रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचबरोबर मंथरा ही भूमिका कोण साकारणार हे समोर आले आहे.
‘रामायण’ चित्रपटात कोण साकारणार मंथरा?
रामायणावर आधारित अनेक चित्रपट आणि दूरदर्शन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. १९८० च्या दशकात रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेने इतिहास रचला होता. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांनी साकारलेली मंथरा ही भूमिका प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. ललिता पवार यांच्या दमदार अभिनयामुळे हे पात्र अजरामर ठरले. आता २०२६ मधील बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटात मंथरा ही भूमिका अभिनेत्री शीबा चड्ढा साकारणार आहेत. ट्रेलरमध्ये त्यांची झलक दिसून आली असून, त्यांच्या लूकने या पात्राबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
अभिनेत्री शीबा चड्ढा या २८ वर्षांपासून सिनेविश्वामध्ये सक्रिय असून, त्यांनी अनेक प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. बॉलीवूडमधील अनेक सिनेमांमधील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या असून, आता त्या ‘रामायण पार्ट १’मध्ये मंथरा ही भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यांनी यापूर्वी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीही भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्या रामायणातील मंथरा कशा प्रकारे साकारणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
शीबा चड्ढा यांनी ५० हून अधिक सिनेमांमध्ये केले आहे काम
शीबा चड्ढा यांनी १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘दिल से…’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमधील प्रभावी भूमिकांमुळे हिंदी मनोरंजनसृष्टीतील दमदार अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. शीबा चड्ढा यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत ५० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’ व ‘गली बॉय’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्याशिवाय ‘मिर्झापूर’ आणि ‘बकैती’सारख्या लोकप्रिय वेब सीरिजमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यानंतर आता त्या ‘रामायण पार्ट १’मध्ये मंथरा ही भूमिका साकारताना दिसणार आहेत. दिवाळी २०२६ मध्ये ‘रामायण पार्ट १’ जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
