Ramayana Teaser Release Runtime: गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर कपूरच्या रामायण या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. सिनेमाचे शूटिंग याआधीच पूर्ण झाले असून अनेक कलाकारांनी सहकलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला.

आता नितिश तिवारी दिग्दर्शित या सिनेमाची झलक समोर आली आहे. निर्मात्यांनी २ एप्रिलला सिनेमाचा टीझर प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्याआधीच त्याचा टीझर पाहायला मिळत आहे. लॉस एंजलिसमधील आयएमएक्स थिएटरमध्ये काही मोजक्या प्रेक्षकांसमोर चित्रपटाचा टीझर दाखवला. त्यावेळी रणबीर कपूर, दिग्दर्शक नितिश तिवारी आणि निर्माता नमित मल्होत्रा हे देखील तिथे उपस्थित होते. त्यांनी प्रश्न व उत्तर यांचे सेशनदेखील घेतले.

टीझरआधीच ‘रामायण’ची झलक आली समोर

यावेळी रणबीर कपूरने त्याच्या भावना व्यक्त केल्या. रामाबद्दलही तो म्हणाला की प्रभू राम हे अब्जावधी लोकांच्या अंतरात्म्याचे मार्गदर्शक आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. ते शतकानुशतके जगभरातील अब्जावधी लोकांच्या अंतरात्म्याचे मार्गदर्शक राहिले आहेत आणि आपल्याच्या नंतरही ते मार्गदर्शन करत राहतील. संकटांच्या वेळी ते करुणा, धैर्य, धर्मनिष्ठा आणि क्षमाशीलतेचे प्रतीक आहेत. त्यांना ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणतात. ज्याचा अर्थ आदर्श पुरुष असा होतो.”

Award Banner

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा थिएटरमधील आहे. टीझर पाहिल्यानंतर चाहते आनंदी झाले. काहीजण आश्चर्यचकित झाले. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असल्याचेदेखील चाहत्यांनी म्हटले.

एकाने लिहिले, “रणबीर कपूर फक्त दोन सेंकदच प्रभू रामांच्या भूमिकेत दिसला, त्यावेळी थिएटरमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.” आणखी एकाने लिहिले, “रणबीर कपूर फक्त दोन सेंकद स्क्रीनवर होता, पण अंगावर काटा आला. फक्त दोन सेंकद पाहिल्यानंतर ही अवस्था असेल, तर कल्पना करा संपूर्ण चित्रपट कसा असेल? हा फक्त चित्रपट नाही, तर हा चित्रपट म्हणजे भावना आहेत.” एकाने लिहिले, “गर्दीतून कोणीतरी ओरडले की आम्हाला तुझा अभिमान आहे. रामाची पहिली झलक पाहिल्यानंतर त्या भूमिकेला, रणबीर कपूरला इतके प्रेम मिळत आहे.”

चित्रपटाचा टीझर कधी प्रदर्शित होणार याबद्दल सिनेमाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी खुलासा केला होता. २ एप्रिलला हनुमान जयंती दिवशी हा टीझर प्रदर्शित करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. रिपोर्टनुसार, हा टीझर २ मिनिट ३८ सेंकदाचा आहे.