Manoj Muntashir Ramayana Trailer : बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या पहिल्या भागाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. नमित मल्होत्रा यांच्या या ‘रामायण’ चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून, रणबीर कपूरने प्रभू रामांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री साई पल्लवी ही माता सीता, तर दाक्षिणात्य स्टार यश हा रावणाची भूमिका साकारत आहे. या सिनेमातील रणबीर कपूर याने रामांच्या भूमिकेवर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे; तर सिनेमातील कलाकारांच्या आधुनिक वेशभूषेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामध्ये आता ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आदिपुरुष’ व ‘रामायण’ सिनेमांची तुलना होत असल्याने मनोज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लेखक मनोज मुंतशिर यांनी याआधी ‘आदिपुरुष’ सिनेमाला त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा चुकीचा निर्णय असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता त्यांनी या चित्रपटाला ‘अयशस्वी प्रयत्न’ असेही म्हणाले आहेत. तसेच नितेश तिवारी दिग्दर्शित आगामी ‘रामायण’ आणि ‘आदिपुरुष’ यांची तुलना न करण्याचं मत मनोज मुंतशिर यांनी व्यक्त केले आहे.

आदिपुरुष अयशस्वी प्रयत्न ठरला – मनोज मुंतशिर

मुंबईतील एका कार्यक्रमात मनोज मुंतशिर यांनी ‘रामायण’ सिनेमावर प्रतिक्रिया दिली. यावेळी म्हणाले, ” ‘रामायण’ सिनेमाची ‘आदिपुरुष’ सिनेमाशी तुलना करणं बरोबर नाही. कारण- तो सिनेमा प्रेक्षकांना आवडला नाही आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. आता ही गोष्ट मान्य करण्यात काहीच लाज किंवा कमीपणा वाटत नाही. आदिपुरुष या सिनेमाच्या टीमनेही खूप मेहनत घेतली होती; पण तो एक अयशस्वी प्रयत्न ठरला.”

पुढे ते म्हणाले, “पण आदिपुरुष या सिनेमाची गाणी आणि संगीत प्रेक्षकांना आवडलं, याचा मला खूप अभिमान आहे. प्रेक्षकांनी या सिनेमातील गाण्यांचं कौतुक केलं. ‘रामायण’ सिनेमाचं संगीतही त्याही जास्त यशस्वी ठरावं, अशीच माझी इच्छा आहे.” मनोज मुंतशिर यांनी ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता यश याचं कौतुक केलं. ते म्हणाले, “यश हा एक खूप चांगला अभिनेता आहे, यात कोणतीही शंका नाही. आपल्या पौराणिक कथा जगभरात पोहोचवणाऱ्या प्रत्येक सिनेमाला माझ्या सदिच्छा आहेत. ‘रामायण’ सिनेमा यशस्वी व्हावा यासाठीही माझ्या शुभेच्छा आहेत.”

प्रभू श्रीराम आणि हनुमान यांना योग्य न्याय देऊ शकलो नाही – मनोज मुंतशिर

यापूर्वी ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत मनोज मुंतशिर यांनी ‘आदिपुरुष’बद्दल खंत व्यक्त केली होती. ते म्हणाले, “सुरुवातीला मी चित्रपटावर झालेल्या टीका आणि विरोधाकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं नव्हतं. पण, मी खोटं बोलणार नाही. लोकांनी हे जाणून घ्यावं की, आदिपुरुष हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा चुकीचा निर्णय होता. त्याहून मोठी चूक म्हणजे मी त्या चित्रपटाचं समर्थन केलं. या चित्रपटाबाबत जे काही घडलं, त्याबद्दल मला वाईट वाटतं आणि आणि माझ्या वागण्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. या चित्रपटातून आम्ही प्रभू श्रीराम आणि हनुमान यांना योग्य न्याय देऊ शकलो नाही. त्यावेळी मला ही गोष्ट समजली नव्हती.”

‘रामायण’ कधी होणार प्रदर्शित?

प्रभू रामांच्या जीवनावर आधारित ‘रामायण’ हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागाचा ट्रेलर रिलीज झाला असून, या वर्षीच्या दिवाळीला सिनेमा जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी प्रभू रामांवर आधारित ‘आदिपुरुष’ सिनेमा रिलीज झाला होता. मात्र, कलाकारांच्या भूमिका, संवाद आणि व्हीएफएक्सवर प्रेक्षकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.