रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला आणि लोकप्रिय कलाकारांची तगडी स्टारकास्ट असलेला नितेश तिवारी दिग्दर्शित बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. ट्रेलरमध्ये भगवान विष्णूंच्या भूमिकेत नेमका कोणता अभिनेता दिसतोय? याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटात रणबीर कपूर श्रीराम आणि परशुराम या दोन भूमिका साकारणार असल्याचं आधीच स्पष्ट झालं आहे. मात्र, ट्रेलरमध्ये काही क्षणांसाठी दिसणाऱ्या भगवान विष्णूंच्या सीनमुळे ही भूमिका कोणता अभिनेता साकारत आहे याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुक्ता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर अनेक जण हा अभिनेता नेमका कोण आहे, यावर चर्चा करत असून विविध नावं पुढे आली आहे. ट्रेलरमधील या छोट्याशा दृश्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

रामायणमध्ये कोण साकारणार विष्णूंची भूमिका?

ट्रेलरमध्ये भगवान विष्णूंच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता नेमका कोण, याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. काही प्रेक्षकांच्या मते, ही भूमिका सौरभ राज जैनने साकारली आहे. ‘महाभारत’ मालिकेत भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारून सौरभ राज जैनने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळे ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या भगवान विष्णूंच्या लूकची तुलना अनेक चाहते त्याच्या लूकशी करत आहेत.

मात्र, सोशल मीडियावरील काही चाहत्यांचा अंदाज वेगळाच आहे. त्यांच्या मते, ट्रेलरमध्ये भगवान विष्णूंच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू असू शकतो. विशेष म्हणजे, महेश बाबू सध्या एस. एस. राजामौली यांच्या ‘वाराणसी’ या चित्रपटात काम करत आहे. परंतु, अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

याशिवाय आणखी एक शक्यता चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. रणबीर कपूरने यापूर्वीच ‘रामायण’ चित्रपटात तो भगवान श्रीराम आणि परशुराम अशा भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं होतं. एका मुलाखतीत त्याने श्रीराम आणि परशुराम हे दोघेही भगवान विष्णूंचे अवतार असल्याचंही नमूद केलं होतं. यामुळे आता काही चाहत्यांचा असा अंदाज आहे की, ट्रेलरमध्ये दिसणारे भगवान विष्णू यांच्या भूमिकेत देखील रणबीर कपूरच असू शकतो. मात्र, ट्रेलरमध्ये याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे भगवान विष्णूंची भूमिकाही रणबीरनेच साकारली आहे का, याबाबत कुठलीच ठोस माहिती उपलब्ध नाही.

‘रामायण’च्या ट्रेलरची सुरुवात दाक्षिणात्य अभिनेता यश साकारत असलेल्या रावणाच्या संवादाने होते. तो स्वतःला त्रैलोक्याचा अधिपती असल्याचं जाहीर करतो. रावणाच्या अत्याचारांमुळे आणि वाढत्या अराजकतेमुळे पृथ्वीवर संकट ओढवल्यानंतर भगवान विष्णू श्रीरामांचा अवतार धारण करून धर्म आणि न्यायाचं रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतात. यानंतर ट्रेलरमध्ये रणबीर कपूर साकारत असलेल्या श्रीरामांची झलक पाहायला मिळते. राक्षसांचा संहार करत ते आपल्या प्रजेचं संरक्षण करताना दिसतात.

पुढे त्यांचा आणि सीता (साई पल्लवी) यांचा विवाह दाखवण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर श्रीराम १४ वर्षांच्या वनवासासाठी जाताना दिसतात. त्यांच्याबरोबर सीता आणि लक्ष्मण (रवी दुबे) देखील वनवासात जाण्याचा निर्णय घेतात. पुढे रावण सीतेचं अपहरण करतो आणि त्यानंतर
श्रीराम सितेला पुन्हा आणण्याचा प्रण घेताना दिसतात. एकूणच चित्रपटाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, नमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण : पार्ट १’ हा चित्रपट यंदा दिवाळीत प्रदर्शित होणार असून, ‘रामायण : पार्ट २’ दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.