Ramayana to release on international 2 days before India: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या भव्य चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निर्मात्यांनी या आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा इंग्रजी ट्रेलर प्रदर्शित केला असून, यात कलाकारांचे इंग्रजी संवाद ऐकायला मिळत आहेत. हा चित्रपट जगभरात ६ नोव्हेंबरला तर भारतात दिवाळीच्या दिवशी म्हणजेच ८ नोव्हेंबरला प्रदर्शित केला जाईल. रिलीजच्या या दोन वेगवेगळ्या तारखांमागील कारण आता निर्माते नमित मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे.

भारतात रामायण ८ नोव्हेंबरला रिलीज होईल, असं नमित मल्होत्रा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना स्पष्ट केलं. तारखांमधील फरकाबद्दल मल्होत्रा म्हणाले, “आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर ६ नोव्हेंबरला चित्रपट रिलीज करत आहोत. विदेशात चित्रपट शुक्रवारी रिलीज होतात, म्हणून तिथे ६ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. पण भारतात आम्ही दिवाळीच्या दिवशीच रिलीज करत आहोत.”

‘रामायण’ जगभरात ६ नोव्हेंबरला रिलीज होईल, तर भारतातील प्रेक्षकांना आणखी दोन दिवस वाट पाहावी लागेल. ‘रामायण’ भारतात ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल, पण याचा चित्रपटाला थोड्या प्रमाणात फटकाही बसू शकतो. कारण दिवाळीचा उत्साह, सुट्टी, लक्ष्मीपूजन यामुळे चित्रपटगृहांमधील प्रेक्षकांची गर्दी कमी होऊ शकते.

टायगर ३ च्या कलेक्शनवर झालेला परिणाम

याचं एक उदाहरण म्हणजे सलमान खानचा ‘टायगर ३’ हा चित्रपट. हा चित्रपटही दिवाळीच्या दिवशी रिलीज झाला होता. तेव्हा दिवाळी रविवारी होती, यावर्षीही रविवारीच आहे. सणामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर परिणाम झाला होता आणि पहिल्या दिवशी दिवसा कमी गर्दी झाल्याने ओपनिंग डे कलेक्शनला त्याचा फटका बसला. ‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, ‘टायगर ३’ ने भारतात पहिल्या दिवशी ४४.५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. हे कलेक्शन यशराज फिल्म्सच्या ‘पठाण’सारख्या इतर स्पाय युनिव्हर्स चित्रपटांपेक्षा कमी होते, कारण पठाणने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली होती. ‘पठाण’ प्रजासत्ताक दिनाच्या वीकेंडआधी बुधवारी रिलीज झाला होता आणि त्याला मोठा वीकेंड मिळाला होता. पहिल्या सोमवारीच चित्रपटाने २८० कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, ‘टायगर ३’ ला वीकेंडचा फायदा मिळू शकला नव्हता, त्यामुळे पहिल्या पाच दिवसांत त्याची कमाई १८७.६५ कोटी रुपये होती.

तब्बल ४ हजार कोटी रुपये खर्च करून निर्मात्यांनी ‘रामायण’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवी दुबे, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग, सनी देओलसह अनेक कलाकारांची यात मांदियाळी आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडेल आणि जगभरातही दमदार कलेक्शन करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.