असा एक काळ होता जेव्हा बॉलीवूडमध्ये रोमँटिक आणि सामाजिक विषयावर भाष्य करणारे चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत होती, तेव्हा खूप कमी निर्माते हॉरर सिनेमे बनवत होते. महल आणि बीस साल बाद अशा चित्रपटांचा यामध्ये समावेश होतो. या चित्रपटांची निर्मिती रामसे बंधूंनी केली होती. १९७० च्या दशकात या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
दो गज जमीन के नीचे, पुराना मंदिर, वीराना, पुरानी हवेली, बंद दरवाजा असे अनेक चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजले. इतके यश मिळाले असले तरी चित्रपट निर्माते त्यांना कायमच ते सी ग्रेड चित्रपट बनवत असल्याचे म्हणतात.
आता तुलसी रामसे यांचा मुलगा दीपक रामसे यांनी एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे. दीपक रामसे यांनी नुकतीच हिंदी रशला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, “आमचे चित्रपट अत्यंत कमी बजेटमध्ये बनत असत. ते प्रायोगिक सिनेमे होते. नवीन कलाकारांना एकत्रित आणणे, त्यांना महाबळेश्वरला नेणे आणि पूर्ण चित्रपट बनवणे हा इतरांसाठी विनोद होता. इतर चित्रपट निर्माते १०० लोकांबरोबर काम करत असत, त्यांच्याकडे व्हॅनिटी व्हॅन असत, त्यांचे बजेट मोठे असे, मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असे. पण, हे सगळे करूनही त्या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळेलच असे नाही. दुसरीकडे रामसे बंधूंचे कमी बजेटचे चित्रपट मोठ्या प्रमाणात कमाई करत असत. अनेक वितरकांनी आमच्या चित्रपटांमधून इतके पैसे कमावले की, अखेरीस ते प्रस्थापित वितरक बनले.”
दीपक रामसे असेही म्हणाले, “जेव्हा ए-लिस्ट फिल्म, विशेषत:जेव्हा अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेले चित्रपट जेव्हा प्रदर्शित व्हायचे, तेव्हा त्या चित्रपटाबरोबर इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस कोणीही करत नसे. जर बिग बींच्या चित्रपटाबरोबर सिनेमा प्रदर्शित केला, तर तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, असे मानले जायचे, इतकी अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता होती. याला अपवाद फक्त रॅमसे बंधूंचा होता. रॅमसे बंधूंनी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना या सुपरस्टार कलाकारांच्या चित्रपटांबरोबर त्यांचे चित्रपट प्रदर्शित केले. याचे कारण म्हणजे आम्हाला आमच्या चित्रपटांवर विश्वास होता.”
कपूर कुटुंबाशी होणाऱ्या तुलनेबद्दल बोलताना दीपक रामसे म्हणाले, “कपूर कुटुंब खूप मोठे आहे. त्यांच्याशी आमचे सलोख्याचे संबंध होते. राज कपूर यांची चित्रपट निर्मितीची शैली आणि चित्रपटांचे प्रकार पूर्णपणे वेगळे होते, त्यामुळे कपूर आणि रॅमसे यांच्या चित्रपटांची तुलनाच होऊ शकत नाही. आम्ही पृथ्वीराज कपूर यांच्या काळापासून एकत्र काम करत आलो आहोत. पण रामसे हे कोणत्याही प्रकारे कमी दर्जाचे चित्रपट बनवत नव्हते. चित्रपट यशस्वी होईल यासाठी ते प्रयत्न करायचे.”
१९७० च्या दशकात चित्रपटसृष्टीने रामसे बंधूंची फारशी दखल घेतली नाही. पण, ‘पुराना मंदिर’च्या यशानंतर परिस्थिती बदलली. तेव्हाच कपूर कुटुंबासह बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या चित्रपट घराण्यांनीही त्यांची दखल घ्यायला सुरुवात केली. ‘मदरलँड’ मासिकाशी बोलताना तुलसी रामसे एकदा म्हणाले होते, “ते आमच्यावर हसत राहायचे आणि आम्ही भाऊ काय करत आहोत याचा विचार करायचे. पण तरीही ते आमचे चित्रपट बघायचे.”
