Ranbir Kapoor On Yeh Jawaani Hai Deewani Sequel : बॉलीवूडच्या काही ‘ऑलटाइम फेवरेट’ सिनेमांपैकी एक म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचा ‘ये जवानी है दीवानी’ हा सिनेमा. हा सिनेमा २०१३ मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अनेक प्रेक्षक या सिनेमाचा सीक्वेल यावा, अशी इच्छा आजही व्यक्त करताना दिसतात.

‘ये जवानी है दीवानी’मध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणसह कल्की कोचलिन आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकांत होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरीच वर्षे उलटून गेली आहेत. तरीही लोकांमध्ये त्याची क्रेझ संपलेली नाही. चाहते अनेकदा सोशल मीडियावर सिनेमाच्या सीक्वेलबद्दल विचारत असतात. अशातच स्वत: रणबीरने चित्रपटाच्या सीक्वेलच्या चर्चांना उत्तर दिले आहे.

आगामी दिवसांत बॉलीवूडच्या अनेक ‘कल्ट’ सिनेमांचे सीक्वेल येणार आहेत. त्यामुळे चाहते ‘ये जवानी है दीवानी’च्या सीक्वेलचीसुद्धा वाट बघत होते; पण यावर रणबीरने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अलीकडेच रणबीरने ARKS च्या इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी झालेल्या या लाइव्हमध्ये रणबीरला ‘ये जवानी है दीवानी’च्या सीक्वेलविषयी विचारण्यात आले.

या सीक्वेलबद्दल रणबीर म्हणाला, “तुमच्यापैकी अनेकांना या सिनेमाचा दुसरा भाग यावा, असं वाटतंय. पण आता खूप नवीन दिग्दर्शक प्रेक्षकांच्या भेटीला नवीन कथा नवीन विषय असलेले असलेले सिनेमे घेऊन येत आहेत. ‘ये जवानी है दीवानी’चा शेवट अगदी योग्य होता. त्यामुळे मला वाटत नाही की, त्याच्या दुसऱ्या भागाची किंवा सीक्वेलची काही गरज आहे.” तसेच यापुढे त्याने “कदाचित अशाच जॉनरचा एखादा वेगळा सिनेमा भविष्यात लवकरच येईल, जो तुम्हाला आवडेल. तुम्ही तो एन्जॉय कराल” असेही म्हटले. त्यामुळे आता ‘ये जवानी है दीवानी’चा सीक्वेल येणार नाही, हे स्वत: रणबीरनेच स्पष्ट केले आहे.

दरम्यान, रणबीरच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, येत्या काळात त्याचे अनेक बिग बजेट सिनेमे येणार आहेत. त्यात ‘रामायण’, ‘अ‍ॅनिमल २’ व ‘लव्ह अँड वॉर’सारख्या सिनेमांचा समावेश आहे. त्यासह ‘ब्रह्मास्त्र’ची दुसऱ्या भागाचीसुद्धा चर्चा आहे. या सर्व सिनेमांतून रणबीरला पाहण्यासाठी त्याचे अनेक चाहते खूपच उत्सुक आहेत.