रणबीर कपूरने काल, २८ सप्टेंबरला ४४वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्याची आणि दीपिका पादुकोणची जुनी लव्हस्टोरी पुन्हा चर्चेत आली आहे. दोघेही बॉलीवूडमध्ये करिअरच्या सुरुवातीच्या काळात रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही काळानंतर त्यांचं नातं संपुष्टात आलं. दरम्यान, दीपिकाने रणबीरबरोबरच्या नात्याबद्दल केलेलं जुनं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे.

काही वर्षांपूर्वी दीपिका पादुकोणने एका मुलाखतीत तिच्या जुन्या नात्यातील फसवणुकीबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं होतं. कॉस्मोपॉलिटनला दिलेल्या मुलाखतीचा तिने सांगितलं होतं की, तिच्या प्रियकराने विनंती केल्यानंतर तिने त्याला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला होता. दीपिकाने सांगितलं होतं की, आजूबाजूचे लोक त्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा सल्ला देत असतानाही तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. मात्र, नंतर तिने त्याला रंगेहाथ पकडलं. या अनुभवातून बाहेर पडण्यासाठी तिला काही काळ लागला. त्यानंतर मात्र ती पुन्हा त्या नात्यात अडकली नाही.

काय म्हणालेली दीपिका पादुकोण

“मी दुखावले होते, पण त्या अनुभवातून बाहेर पडल्यानंतर मी पुन्हा कधीही मागे वळून पाहिलं नाही,” असं दीपिकाने म्हटलं होतं. दीपिकाने पुढे सांगितलं की, सुरुवातीला तिच्या प्रियकराने फसवल्यानंतर तिने तिच्यात किंवा नात्यातच काहीतरी चूक आहे का, असा विचार केला होता. मात्र, जेव्हा समोरची व्यक्ती वारंवार फसवणूक करू लागते, तेव्हा समस्या नेमकी कुठे आहे हे लक्षात येतं, असं ती म्हणाली. नात्यात विश्वास आणि आदर या दोन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचंही दीपिकाने सांगितलं. ती खूप काही देते, मात्र फसवणूक झाल्यानंतर विश्वास आणि आदर दोन्ही संपतात आणि त्यामुळे ते नातं टिकवणं तिच्यासाठी शक्य नसतं, असं तिने स्पष्ट केलं.

दीपिका पादुकोण व रणबीर कपूर यांचा जुना एकत्रित फोटो

ब्रेकअपनंतरच्या काळाबद्दल बोलताना दीपिकाने सांगितलं होतं की, या अनुभवामुळे ती एक व्यक्ती किंवा एका नात्यावर खूप अवलंबून राहू नये, हे शिकली. ब्रेकअपनंतर ती खूप रडली, मात्र या अनुभवामुळे ती अधिक चांगली व्यक्ती बनली, असं तिने म्हटलं होतं.

ब्रेकअपनंतर रणबीर आणि दीपिका दोघांनीही त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. रणबीर कपूरने एप्रिल २०२२ मध्ये आलिया भट्टशी लग्न केलं आणि त्यांना राहा ही मुलगी आहे. तर दीपिका पादुकोणने २०१८ मध्ये रणवीर सिंहशी लग्न केलं. या दोघांना सप्टेंबर २०२४ मध्ये मुलगी दुआ झाली. त्यानंतर १९ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांना दुसरी मुलगी झाली.