अलीकडेच रणबीर कपूरने रामायणातील पौराणिक पुष्पक विमानाची तुलना एलॉन मस्कच्या उडणाऱ्या कारशी (फ्लाइंग कार) केली. भारताकडे ही संकल्पना तब्बल ५,००० वर्षांपूर्वीच होती, असं तो म्हणाला. त्यामुळे सध्या त्याचं हे वक्तव्य चर्चेत आहे. एका चॅट शोमध्ये चर्चा करत असताना त्याने याबद्दल सांगितलं.

टीव्ही निवेदिका सुमाच्या ‘चॅट शो’मध्ये रणबीरने ही टिप्पणी केली. यावेळी त्याच्याबरोबर सहकलाकार रवी दुबे, रकुल प्रीत सिंह आणि यश तसेच दिग्दर्शक नितेश तिवारी उपस्थित होते. या मुलाखतीत प्रामुख्याने चित्रपटातील काल्पनिक गोष्टी, शस्त्रास्त्रं आणि आजच्या काळानुसार या गोष्टीकडे नवीन पिढी कशी पाहत असेल यावर चर्चा सुरू होती. चित्रपटात रामाची भूमिका साकारणाऱ्या रणबीरने भारताची प्राचीन कल्पकता अधोरेखित करण्यासाठी एलॉन मस्कचा उल्लेख केला.

रणबीर कपूर काय म्हणाला?

यावेळी रणबीर कपूर म्हणाला, “एलॉन मस्कने नुकतीच एक उडणारी कार तयार केली आहे. पण मला वाटतं, भारताने ही गोष्ट ५,००० वर्षांपूर्वीच केली होती!” असं म्हणत त्याने रामायणातील पुष्पक विमानाचा उल्लेख केला. याच मुलाखतीत दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी पुष्पक विमानाची रचना तयार करण्यासाठी जवळपास दोन वर्षे लागल्याचा खुलासा केला. याबद्दल ते म्हणाले, “पुष्पक विमानाची अंतिम रचना निश्चित करण्यासाठी आम्हाला जवळपास दोन वर्षे लागली. या काळात त्याच्या डिझाइनमध्ये अनेक बदल झाले. त्यामुळेच रावण आणि जटायू यांच्यातील युद्धाचा प्रसंग तयार करण्यासाठीही बराच वेळ लागला. सुरुवातीला पुष्पक विमानाची एक वेगळीच रचना आमच्या डोळ्यांसमोर होती आणि त्यानुसार युद्धाच्या प्रसंगाचं चित्रीकरण कसं करायचं, याचं नियोजन केलं होतं. मात्र, नंतर विमानाची अंतिम रचना थोडी वेगळी ठरल्याने आधी ठरवलेल्या प्रसंगाशी ती जुळवून घेण्यासाठी आम्हाला अनेकदा बदल करावे लागले.” या भव्य उडत्या विमानाची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही पाहायला मिळते. यावरून निर्मात्यांनी या संकल्पनेवर किती कल्पकतेने काम केलं आहे, याची कल्पना येते.

टेस्लाची बहुचर्चित नेक्स्ट जनरेशन रोडस्टर कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एलॉन मस्क यांनी जवळपास दशकभरापूर्वी या नव्या कारची घोषणा केली होती. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी टेक्सासमधील वाको येथे झालेल्या एका कार्यक्रमात या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारचं अनावरण केलं. स्पेसएक्सच्या रॉकेट निर्मिती आणि चाचणी केंद्रात झालेल्या प्रात्यक्षिकादरम्यान ही कार एका मोठ्या रॅम्पवर उलटी चालवण्यात आली. त्यानंतर हवेत पलटी मारून ती सुरक्षितपणे जमिनीवर उतरली. हे प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर मस्क यांनी अवघ्या दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली, “वेल, इट वर्क्ड” (बरं, हे काम यशस्वी झालं!).

दरम्यान, हिंदू पौराणिक कथांनुसार, पुष्पक विमानाची निर्मिती विश्वकर्मा यांनी केली होती. विश्वकर्मा हे देवांचे शिल्पकार मानले जातात. त्यांनी हे विमान ब्रह्मदेवांसाठी तयार केलं होतं. त्यानंतर ब्रह्मदेवांनी ते धनदेवता कुबेर यांना भेट म्हणून दिलं. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ होता. मात्र, रावणाने कुबेराचा पराभव करून त्याच्याकडून पुष्पक विमान हिसकावून घेतलं होतं. असं म्हटलं जातं.