Ranbir Kapoor Troll : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या ‘रामायण’ या आगामी सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात तो प्रभू श्रीराम यांची भूमिका करत आहे. सिनेमाची उत्सुकता असतानाच त्यानं या भूमिकेसाठी मांसाहार सोडल्याच्या चर्चासुद्धा झाल्या, यामुळे कौतुक होत असलेला रणबीर आता टीकेचा धनी झाला आहे.
नेटफ्लिक्सच्या ‘डायनिंग विथ द कपूर्स’ या रिअॅलिटी शोमध्ये अभिनेता मांसाहार खाताना दिसल्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर टीका केली जात आहे. ट्रोलर्सनी असा दावा केला की, रणबीर कपूरने ‘रामायण’ चित्रपटासाठी रामाच्या भूमिकेसाठी मांसाहार आणि मद्यपान सोडलं होतं. पण, या व्हिडीओतून त्यानं मांसाहार केल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे.
‘रामायण’साठी मांसाहार सोडल्याचा रणबीरने केलेला दावा
२२०२३ मध्ये रणबीरने एका मुलाखतीत कबूल केले होते की त्याने ‘रामायण’ चित्रपटासाठी काम सुरू करण्यापूर्वीच मांसाहार आणि मद्यपान सोडलं होते. त्याने सांगितले होते, “माझ्या प्रकृतीसाठी आणि माझी मुलगी राहासाठी मी मांसाहार सोडला आहे. मी शाकाहारी झालो आहे आणि आता योगा आणि ध्यान करत आहे. मी आता पूर्णपणे माझी जीवनशैली सुधारली आहे. माझ्या मुलीसाठी आणि स्वतःसाठी मी स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करत आहे.”
मांसाहार सोडल्याच्या प्रतिक्रियानंतर त्यानं आता मांसाहार केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. रणबीरच्या पीआर टीमवर टीका केली जात आहे. एका व्यक्तीने लिहिलं, “रणबीर कपूरच्या पीआर टीमने दावा केला होता की त्याने रामायणमध्ये रामाची भूमिका साकारण्यासाठी नॉन-व्हेज सोडलं, पण आता तो मांसाहार खात आहे. बॉलीवूडमध्ये रणबीर कपूरचा पीआर खूपच प्रभावी आहे.
आणखी एकाने लिहिलंय, “माझ्या मते, बॉलीवूड अभिनेत्यांच्या पीआर टीम्सला कामावरून काढले पाहिजे, खासकरून रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या टीमला. त्यांनी भूमिका साकारताना मांसाहार आणि मद्यपान सोडल्याचा दावा का केला? कोणत्याही कारणाशिवाय त्यांनी असे दावे का केले? जर त्यांनी तेव्हा तोंड बंद ठेवलं असतं, तर आज हे अनावश्यक ट्रोलिंग त्यांना सहन करावं लागलं नसतं.”
रणबीरने खाल्लेले पदार्थ मांसाहारी होते की शाकाहारी हे व्हिडीओमध्ये पूर्णपणे स्पष्ट दिसत नाहीय, पण ते मांसाहार असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे, ज्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. दरम्यान, ‘रामायण’ सिनेमा पुढील वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. हा सिनेमा दोन भागांमध्ये रिलीज होईल. २०२७ मध्ये दुसरा भाग येणार आहे. सिनेमात रणबीरसह साई पल्लवी, यश आणि सनी देओलसह आणखी काही कलाकारांच्या भूमिकाही आहेत.
