Ranbir Kapoor loses cool at paparazzi: नीतू कपूर व कपिल शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला दादी की शादी हा सिनेमा शुक्रवारी (८ मे) प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. त्याबरोबरच सिनेमातील गाणेदेखील प्रदर्शित झाले होते. चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये रिद्धिमा कपूर व तिची मुलगी यांचीदेखील झलक पाहायला मिळाली होती.
नुकताच दादी की शादी या सिनेमाचे स्क्रीनिंग पार पडले. अनेक कलाकारांनी चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. रणबीर कपूरही पत्नी आलियासह चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी उपस्थित राहिला होता.
रणबीर कपूर पापाराझींवर का संतापला?
या सगळ्यात रणबीर कपूर एका वेगळ्याच कारणामुळे मोठ्या चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दादी की शादी या चित्रपटाचे जिथे स्क्रीनिंग होते, तिथला हा व्हिडीओ आहे.
चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर आलिया व रणबीर कपूर जात होते. त्यावेळी त्यांचे फोटो काढण्यासाठी पापाराझींनी तिथे गर्दी केली आणि त्यामुळे तिथे गोंधळ निर्माण झाला. तो पापाराझींना म्हणतो की, तुम्हाला चांगले फोटो हवेत ना? त्यावर पापाराझी हो म्हणत असल्याचे दिसते. त्यानंतर तो मागे व्हा, असे म्हणतो. तो पापाराझींना थोडे अंतर ठेवण्यास सांगत आहे. त्यानंतर तो आलियासह तिथून जाताना दिसत आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काहींनी रणबीरची बाजू घेतली आहे; तर काहींनी त्याच्या वागण्यावर टीका केली आहे. तर अनेकांनी, पापाराझी त्यांची सीमा ओलांडतात, असेही म्हटले आहे.
नेटकरी म्हणाले….
एकाने लिहिले, “पापाराझी कलाकारांना उद्धट दाखवण्याचा प्रयत्न करतात; पण ते स्वत: त्यांच्या सीमा विसरतात. त्याने बरोबर केले.” दुसऱ्याने लिहिले, “पापाराझींनी कलाकारांपासून थोडं अंतर ठेवलं पाहिजे. तुम्ही त्यांच्या तितके जवळ जाऊ शकत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कॅमेरा आहे किंवा फोन आहे म्हणून तुम्ही त्यांचे फोटो काढू शकत नाही. आधी तुम्ही त्यांची परवानगी घेतली पाहिजे.” आणखी एकाने लिहिले, “त्यानं बरोबर केलं.” एकाने लिहिले, “मग तुम्ही त्यांना फोटो काढण्यासाठी का बोलावले.” एकाने लिहिले, “त्यांनी पापाराझींना फोटो काढण्यासाठी बोलावले आणि आता ते असे बोलत आहेत”, अशा अनेकविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत.



रणबीर व आलियाबरोबरच कपूर कुटुंबातील अनेकांनी दादी की शादी सिनेमाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. नीतू कपूर व ऋषी कपूर यांची लेक रिद्धिमा कपूर साहनी ४५ व्या वर्षी दादी की शादी सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. तीसुद्धा तिच्या जवळच्या नातेवाइकांसह या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी हजर होती. बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री रेखासुद्धा या सिनेमाच्या स्क्रीनिंगला हजर होत्या.
दादी की शादी या सिनेमाचे दिग्दर्शन आशीष आर. मोहन यांनी केले आहे. आता हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काय कमाल करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, रणबीर कपूरच्या कामाबद्दल बोलायचे, तर तो लवकरच रामायण या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
