संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ हा २०२७ मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातून नेमकं काय पाहायला मिळणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच आता चित्रपटातील रणबीर कपूरचा पहिला लूक समोर आला असून, तो पाहून अनेकजण प्रभावित झाले आहेत. गुरुवारी निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर रणबीरचा पहिला लूक शेअर करत ‘लव्ह अँड वॉर’मधील त्याच्या व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटातील रणबीर कपूरचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे. या पोस्टरमध्ये रणबीर रक्तबंबाळ अवस्थेत गाडी चालवताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर जखमा असूनही तो अत्यंत गंभीर आणि आक्रमक अंदाजात दिसत आहे. या लूकमधून चित्रपटाची कथा आणि रणबीरची भूमिका याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर रणबीरचा हा लूक शेअर करत लिहिलं, “वो रुतबा, वो रौब, वो जुनून. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित लव्ह अँड वॉर २१ जानेवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार असून चित्रपटगृहात भेटू” असं म्हटलं आहे. म्हणजेच हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीरचा हा इंटेन्स लूक चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. पोस्टरवर प्रतिक्रिया देताना चाहत्यांनी “किलर लूक”, “रणबीर कपूरचा कधीही न पाहिलेला लूक”,अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. रणबीरचा याआधी न पाहिलेला अंदाज या पोस्टरमधून पाहायला मिळत असल्याचं अनेक चाहते म्हणत आहेत. विकी कौशलनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन रणबीरचा हा लूक शेअर केला असून त्याला शुभेच्छा देत चित्रपट कधी रिलीज होणार याबद्दलची माहिती दिली आहे.

किती आहे चित्रपटाचं बजेट?

संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटाचं शूटिंग २०२४ पासून सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘लव्ह अँड वॉर’ तब्बल ४२५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार होत आहे. काही महिन्यांपूर्वी ‘Variety India’च्या एका रिपोर्टमध्ये चित्रपटातील कलाकारांनी यासाठी कोणतही मानधन आकारलं नसल्याचं म्हटलं होतं.

तसंच, ‘लव्ह अँड वॉर’ने नेटफ्लिक्सबरोबर १३० कोटी रुपयांची डील केली असल्याचंही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. याशिवाय चित्रपटाच्या म्युझिक आणि सॅटेलाइट राइट्समधून आणखी ७० ते ८० कोटी रुपये मिळाल्याचं सांगितलं जात आहे.