बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘रामायण’ या बिग बजेट चित्रपटामुळे चर्चेत आहे. परंतु, जेव्हापासून तो चित्रपटात श्रीरामांची भूमिका साकारणार हे जाहीर झालं तेव्हापासूनच प्रेक्षकांचे दोन गट निर्माण झाले. काही त्याला या नवीन आणि वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत तर काहींच्या मते तो या भूमिकेसाठी योग्य नसून त्याच्यावर टीकाही होत आहे. अशातच आता ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या नातवाने याबद्दल प्रतिक्रिया देत या रणबीर या भूमिकेसाठी योग्य पसंती नसल्याचं म्हटलं आहे.
शिव सागर हे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे नातू आहेत. रामानंद सागर यांनी १९८७ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेली लोकप्रिय ‘रामायण’ मालिका आणि त्यानंतरची ‘लव-कुश’ मालिका बनवली होती. नुकतंच शिव यांनी श्रीरामांच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरच्या निवडीबद्दल नाराजी व्यक्त केली. विशेषतः ‘ॲनिमल’ चित्रपटात रणबीरने साकारलेल्या हिंसक व्यक्तिरेखेमुळे त्यांनी या कास्टिंगवर प्रश्न उपस्थित केले.
मी रणबीर कपूरला रामाच्या भूमिकेत स्वीकारू शकत नाही – शिव सागर
एएनआयच्या वृत्तानुसार, शिव सागर म्हणाले, “एका कास्टिंगचा अपवाद वगळता बाकीची संपूर्ण कास्टिंग मला खूप आवडली आहे. मात्र, वैयक्तिकरित्या मी रणबीर कपूरला रामाच्या भूमिकेत स्वीकारू शकत नाही. ॲनिमलनंतर मला त्याला रामाच्या भूमिकेत पाहायला जमणार नाही. जेव्हा मी रामजींकडे पाहतो, तेव्हा त्यांच्या भूमिकेसाठी एखादा नवोदित चेहरा निवडायला हवा होता, असं मला वाटतं.”
“रणबीरला वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहिलं आहे आणि तो खूप चांगला अभिनेता आहे. वैयक्तिकरित्या माझं त्याच्याविरोधात काहीही नाही. मला वाटतं, निर्मात्यांनी या प्रोजेक्टसाठी त्याची निवड कदाचित मार्केटिंगच्या दृष्टीने केली असावी. रणबीरला घेतलं नसतं, तर या चित्रपटाचं तितकं चांगलं मार्केटिंग करता आलं नसतं, असाही त्यांचा विचार असू शकतो. त्यामुळे हा मुद्दाही विचारात घ्यायला हवा. मात्र, माझं वैयक्तिक मत आहे की, अशा व्यक्तिरेखांसाठी नवा चेहरा निवडणं अधिक योग्य ठरतं,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
दिग्दर्शक-निर्माते शिव सागर यांनी ‘रामायण’मधील इतर कलाकारांचंही कौतुक केलं. यशने साकारलेल्या रावणाच्या भूमिकेपासून ते साई पल्लवीच्या सीतेच्या भूमिकेपर्यंत त्यांनी सर्व कलाकारांचं कौतुक केलं. “तुम्ही खूप दमदार कलाकारांना सहाय्यक भूमिकांमध्ये घेऊ शकता. यश खूप चांगला दिसत आहे, साई पल्लवीही खूप सुंदर दिसत आहे. त्यांच्यावर तितकं बॅगेज नाही. मात्र, रणबीरवर बरंच बॅगेज आहे. म्हणूनच आम्ही आमच्या मालिकांमध्ये सहसा नव्या चेहऱ्यांना संधी देतो. त्यांच्याबरोबर कोणतंही बॅगेज नसतं,” असं शिव सागर म्हणाले.
