Ranbir Kapoor got slapped for entering temple in chappals: रणबीर कपूरला एकदा वडील ऋषी कपूर यांनी मारले होते, याबद्दल अभिनेत्याने खुलासा केला होता. तसेच त्याचे कारण काय होते हेही सांगितले होते. अभिनेत्याने नेटफ्लिक्सच्या द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये आई नीतू कपूर यांच्याबरोबर हजेरी लावली होती.
“तेव्हा मी आठ किंवा नऊ वर्षांचा…”
यावेळी त्याने ऋषी कपूर व त्याचा एक किस्सा सांगितला होता. तो हसत म्हणालेला, “एकदा मला वडिलांनी जोरात मारलं होतं. आर. के. स्टुडिओत दिवाळीत पूजा होती. माझे वडील खूप धार्मिक होते. मला वाटतं की तेव्हा मी आठ किंवा नऊ वर्षांचा असेन; तर त्या पूजेवेळी मी चप्पल घालून पूजेच्या ठिकाणी गेलो होतो, तर त्यावेळी त्यांनी मला डोक्यावर मारलं होतं.”
ऋषी कपूर यांचे ३० एप्रिल २०२० ला निधन झाले, त्यावेळी ते ६७ वर्षांचे होते. तो काळ रणबीरच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळ होता. रणबीर कपूर म्हणालेला की ज्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की ही ऋषी कपूर यांची शेवटची रात्र आहे, त्यावेळी त्याला पॅनिक अटॅक आला होता. त्याने असाही खुलासा केला होता की, जेव्हा ऋषी कपूर यांचे निधन झाले त्यावेळी तो रडला नाही.
निखिल कामतला दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूर म्हणाला, “मी खूप लहान असतानाच रडणं बंद केलं. माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हाही मी रडलो नाही. मी रात्रभर दवाखान्यात थांबलो होतो. तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की ही त्यांची शेवटची रात्र आहे, ते कधीही आपल्याला सोडून जाऊ शकतात. त्यानंतर मी त्यांच्या खोलीत गेलो आणि मला पॅनिक अटॅक आला.”
तो पुढे म्हणालेला, “माझ्या भावना कशा व्यक्त करायच्या हेच मला कळत नव्हतं. कारण माझ्यासमोर खूप काही घडत होतं आणि ते सगळं स्वीकारणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण, मी कधी त्या दुःखातून बाहेर पडलो किंवा झालेले नुकसान मी पूर्णपणे समजून घेतले, असे मला वाटत नाही.”
दरम्यान, रणबीर कपूर लवकरच ‘रामायण’ आणि ‘लव्ह अँड वॉर’ या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
