Ramayan Teaser Ranbir Kapoor Lord Ram Role : अनेक दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता या सिनेमाचा टीझर व्हिडीओ समोर आला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अशातच आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने निर्मात्यांनी ‘रामायण’चा टीझर प्रदर्शित केला आहे.

टीझर प्रदर्शित होताच सर्वत्र अभिनेता रणबीर कपूरचे कौतुक होत आहे. या टीझरमधून रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत अगदी परफेक्ट दिसत असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. या चित्रपटात प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरचीच निवड का केली, याबद्दल दिग्दर्शकांनी सांगितलं आहे.

श्रीरामांच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरची निवड केली कारण…

न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात दिग्दर्शक नितेश तिवारी रणबीच्या कास्टिंगबद्दल म्हणाले, “प्रभू श्रीराम हे मोजक्या शब्दांत बोलणारं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांचं प्रेम अफाट होतं आणि त्यांचं दुःख वरवर दिसत नसलं तरी ते खोलवर जाणवणारं होतं. त्यांचं धैर्य पडद्यावर मांडण्यासाठी विशिष्ट शारीरिक ताकद हवी होती. प्रभू श्रीराम यांची ही भूमिका अतिशय आव्हानात्मक होती. त्यामुळेच या सर्व भावना प्रभावीपणे पडद्यावर मांडण्यासाठी आणि कोट्यवधी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला रणबीर कपूरशिवाय दुसरा उत्तम पर्याय दिसला नाही.”

Award Banner

पुढे नितेश तिवारी यांनी हेही स्पष्ट केले की, “रामायणाचं सार त्यातील मूल्यांमध्येच आहे. ही मूल्ये सार्वकालिक आहेत. आज लोक ही मूल्ये विसरत चालले आहेत, त्यामुळे त्याची पुन्हा आठवण करून देण्याची ही योग्य वेळ आहे. अशा चित्रपटांमुळे जग आणखी सुंदर होईल, असा मला विश्वास आहे” असं ते म्हणाले.

‘रामायण’साठी रणबीर कपूरने आधी नकार दिलेला कारण…

दरम्यान, या चित्रपटातील प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरने आधी नकार दिला होता. “चार वर्षांपूर्वी जेव्हा नमितनं मला ही भूमिका देऊ केली होती, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया ‘नाही’ अशीच होती. मला वाटलं होतं की, मी या भूमिकेसाठी योग्य नाही आणि मी या भूमिकेला पूर्ण न्याय देऊ शकणार नाही”, असे तो म्हणाला होता.

रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर व्हिडीओ रिलीज

मात्र, नंतर याच भूमिकेला होकार देण्यासाठी रणबीरची लेक राहा कारणीभूत ठरली. त्याबद्दल रणबीर म्हणाला, “त्यावेळी माझ्या आयुष्यात आणि पूर्ण जीवनशैलीत बदल घडवून आणण्याची मला गरज होती. त्याच काळात मी बाबा झालो. प्रभू श्रीराम यांची भूमिका मिळणं आणि बाबा होणं, हा योगायोग माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला आणि मग मी या भूमिकेसाठी होकार दिला.”

३ जुलै २०२५ रोजी ‘रामायण’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली होती. त्यानंतर आज (२ एप्रिल) टीझर समोर आला आहे. ‘रामायण’ चित्रपट दोन भागांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापैकी भाग-१ हा येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे आणि भाग-२ पुढच्या वर्षी म्हणजेच २०२७ मध्ये येईल.