Hans Zimmer Bollywood Music Deubt In Ramayan रणबीर कपूरच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमधून रणबीर कपूर श्रीराम यांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर सिनेमाचं संगीतही अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.  

रणबीर कपूरच्या ‘रामायण’ला हॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार हान्स झिमर यांनी संगीत दिलं आहे. या सिनेमातून हान्स झिमर बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हान्स झिमर हे हॉलीवूडमधील काही प्रसिद्ध संगीतकारांपैकी एक आहेत.

हान्स झिमर यांनी आजवर हॉलीवूडच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांना संगीत व पार्श्वसंगीत दिलं आहे. त्यांच्या संगीताचे जगभर चाहते आहेत. ‘ग्लॅडिएटर’पासून ‘द लायन किंग’ व ‘इन्सेप्शन’पासून ‘इंटरस्टेलर’पर्यंत गाजलेल्या चित्रपटांना संगीत देण्याचं काम हान्स झिमर यांनी केलं आहे. 

Award Banner

‘रामायण’साठी संगीत देण्यासाठी हान्स झिमर यांनी सुरुवातीपासूनच उत्सुकता दाखवली होती. त्यांना ए. आर. रहमान या भारतीय संगीतकाराचीसुद्धा साथ लाभली आहे. ‘रामायण’ चित्रपटाच्या टीझरमधील संगीत ऐकून, अनेकांनी हान्स झिमर व रहमान या संगीतकार जोडीचं कौतुक केलं आहे.

“हान्स झिमर तुम्ही कमाल आहात”, “हान्स झिमर यांचं ‘रामायण’च्या टीझरमधील संगीत खरोखरच अंगावर शहारा आणत आहे”, “हान्स झिमर आणि ए. आर. रहमान ही जोडी आहे म्हणजे नक्कीच प्रेक्षकांना संगीताच्या नव्या पर्वणीचा लाभ होणार” या आणि अशा अनेक कमेंट्स करीत प्रेक्षकांनी ‘रामायण’च्या संगीतासाठी हान्स झिमर यांचं कौतुक केलं आहे.

रणबीर कपूर रामायण टीझर व्हिडीओ

दरम्यान, हान्स झिमर यांचं आजवरचं उल्लेखनीय काम म्हणजे क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘इंटरस्टेलर’साठी त्यांनी दिलेलं संगीत. संगीत क्षेत्रातील कामासाठी त्यांना ग्रॅमी आणि ऑस्करसारखे पुरस्कारही मिळाले आहेत. ‘द लायन किंग’ व ‘ड्युन’साठी त्यांना दोन वेळा ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळाला आहे. तसेच चार वेळा ग्रॅमी आणि तीन वेळा गोल्डन ग्लोब हा पुरस्कारही मिळाला आहे. अशातच त्यांच्या संगीताची छोटीशी झलक पाहायला मिळालीय. त्यामुळे आता संगीतप्रेमी संपूर्ण चित्रपटातील संगीत ऐकण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. 

नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर, साई पल्लवी व यश यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची पहिली झलक नुकतीच निर्मात्यांनी प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. त्यात रणबीर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत आहे; तर साई पल्लवीने सीतेची भूमिका साकारली आहे.