रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या ‘रामायण’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा पहिला लूक काही वेळा पुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि अवघ्या काही क्षणांतच सोशल मीडियासह सर्वत्र याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर राम आणि अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. तर अभिनेत्री साई पल्लवी सीता ही भूमिका साकारत आहे. याशिवाय चित्रपटात आणखी काही कलाकारही आहेत.
नितेश तिवारी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘रामायण’ हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाची निर्मितीवर बराच खर्च करण्यात आला आहे. पण, हा खर्च करणारी आणि या महाग चित्रपटाच्या निर्मितीचं शिवधनुष्य पेलणारी व्यक्ती नक्की कोण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया…
रामायणची निर्मिती नमित मल्होत्राने केली आहे. नमित चित्रपट निर्माते नरेश मल्होत्रा यांचा मुलगा आणि सिनेमॅटोग्राफर एमएन मल्होत्रा यांचा नातू आहे. संगणक ग्राफिक्सचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, नमितने त्याची पहिली कंपनी, व्हिडीओ वर्कशॉप सुरू केली. या कंपनीचे सह-संस्थापक हे त्याच्याच महाविद्यालयातील तीन शिक्षक होते. विशेष म्हणजे नमितचा एडिटिंग स्टुडिओ कोणत्याही आलिशान इमारतीत नव्हता तर गॅरेजमध्ये होता.
नमित मल्होत्रा इन्स्टाग्राम पोस्ट
नमितच्या ‘व्हिडीओ वर्कशॉप’ कंपनीने ‘बूगी वूगी’ आणि ‘गाथा’सारख्या शोसाठी काम केले. ‘व्ही’ चॅनलसाठी पोस्ट-प्रॉडक्शनचं कामही केलं. १९९७ मध्ये, नमितने ‘व्हिडीओ वर्कशॉप’ कंपनीला वडिलांच्या चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात विलीन करून ‘प्राइम फोकस’ची स्थापना केली.
सुरुवातीला, कंपनीने टीव्ही शो आणि चित्रपटांसाठी तांत्रिक सेवा पुरवल्या, त्यानंतर त्याने ‘द हरिकेन हिस्ट’ आणि ‘ब्रह्मास्त्र भाग १’ या चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर जुलै २०१४ मध्ये, ‘प्राइम फोकस’ने व्हीएफएक्स स्टुडीओमध्ये विलीनीकरण केलं. या कंपनीने ‘ब्लेड रनर २०४९’, ‘टेनेट’ आणि ‘टु ड्यून’ चित्रपटांसाठी काम केलं. गेल्या दहा वर्षांत आठ वेळा बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचे ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत.
दरम्यान, ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पहिला भाग २०२६ मध्ये, तर दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या तिघांशिवाय चित्रपटात आणखी अनेक कलाकारांचा समावेश आहे. यात सनी देओल हनुमान, रवी दुबे लक्ष्मण साकारत आहे. याशिवाय रकुल प्रीत सिंह शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार आहेत.