Ramayana movie Jai Jai Ram song released: ‘रामायण’ हा सिनेमा २०२६ मध्ये दिवाळीदरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सिनेमाचे गाणे प्रदर्शित केले आहे.

‘जय जय राम’ असे या गाण्याचे नाव आहे. गाण्याची सुरुवात ‘जय जय राम जय जय राम मेरी पूजा मेरे काम’ या ओळीने होते. व्हिडीओमध्ये पुढे रणबीर कपूरची म्हणजेच रामाची झलक पाहायला मिळते. तसेच, साई पल्लवीही सीतेच्या भूमिकेत दिसते. त्याबरोबरच, राम, लक्ष्मण, भरत यांचीही झलक दिसते.

रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित

एका सीनमध्ये श्रीराम व सीता यांचा विवाहसोहळा पाहायला मिळत आहे. सीता श्री रामाच्या गळ्यात हार घालत असल्याचे दिसत आहे. तसेच, एका दृश्यामध्ये राम धनुष्यबाण उचलत असल्याचे पाहायला मिळते. यावेळी राजवाडा, राजवाड्याचे वैभव, अंगावर दागदागिने हेही दिसते.

गाण्यात पुढे श्रीराम व सीता वनवासाला गेल्याचेही पाहायला मिळते. वनवासातील लक्ष्मणाची साथ, तसेच भरतचा श्रीरामाप्रतिचा आदर, प्रेम या सगळ्यांची झलक या गाण्यात पाहायला मिळते. लक्ष्मण ही भूमिका रवी दुबेने साकारली आहे. तर, भरत या भूमिकेत मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे आहे.

ए. आर. रहमान यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. गाण्याचे बोल डॉ. कुमार विश्वास यांनी लिहिले आहेत. गाण्याला श्रेया घोषाल, अरिजीत सिंहने आवाज दिला आहे. नितेश तिवारी यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. टी सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवर संपूर्ण गाणे प्रदर्शित केले आहे.

प्रेक्षकांना हे गाणे आवडले असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. “मी माझे अश्रू थांबवू शकत नाही”, “हे सीन पाहण्याची वाट पाहत होतो”, “टीझर व ट्रेलरपेक्षा गाण्यात व्हिज्युअल्स चांगले दिसत आहेत”, “हा सिनेमा पाहण्यासाठी मी उत्सुक आहे”, अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

आदिनाथ कोठारेने शेअर केली पोस्ट

आदिनाथ कोठारेनेही सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत सिनेमातील गाणे प्रदर्शित झाल्याचे सांगितले. त्यावर कलाकार, चाहते यांनी कमेंट्स करीत त्याला सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे लिहिले. अमृता खानविलकर, मंजिरी ओक यांनी कमेंट्स करीत कौतुक केले आहे.

दरम्यान, रामायण हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.