Ranbir Kapoor starrer Ramayana movie receives 700 crore OTT offer : नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण’ या आगामी बिग बजेट चित्रपटात बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अलीकडेच चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. २०२६ मध्येच दिवाळीत हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अशातच आता चित्रपट रिलीज होण्यापूर्वी मेकर्सला ओटीटीकडून मोठी ऑफर मिळाली आहे.

हल्ली ओटीटी मनोरंजनाचं महत्त्वाचं माध्यम बनलं आहे. विविध भाषेतील, देशातील कलाकृती सहज घरबसल्या या मार्फत प्रेक्षकांना पाहता येतात. त्यामुळे ओटीटीची क्रेझ वाढत चालली आहे. अनेक चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटीवर रिलीज होतात. त्यामुळे बिग बजेट चित्रपटांना आधीच ओटीटीकडून मोठ्या ऑफर्स येत असतात. अशातच अशीच ऑफर रणबीर कपूरच्या ‘रामायण’लासुद्धा मिळाली होती. परंतु, मेकर्सने ऑफर स्वीकारली नाही. ‘रामायण’साठी ओटीटीकडून किती कोटींची ऑफर मिळालेली आणि या चित्रपटाचं बजेट नेमकं किती आहे तसंच नमित मल्होत्रा यांनी ही ऑफर का स्वीकारली नाही याबद्दल जाणून घेऊयात…

ओटीटीकडून मिळाली कोट्यवधींची ऑफर

अलीकडेच ‘रामायण’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. टीझर आणि यामधील रणबीर कपूरच्या लूकला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. त्यानंतर लगेचच ओटीटीकडून या चित्रपटाच्या निर्मात्याला कोट्यवधींची ऑफर मिळाली. ‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार निर्माते नमित मल्होत्रा यांना ‘रामायण’चे दोन्ही भाग ओटीटीवर रिलीज करण्यासाठी ओटीटीकडून ७०० कोटींची ऑफर मिळाली होती. परंतु, ‘रामायण’ या चित्रपटाचं बजेटच ४००० कोटी असल्यानं ७०० कोटींची डील नमित यांना योग्य वाटली नाही.

Award Banner

उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार नमित मल्होत्रा यांना ओटीटीकडून १००० कोटींची डील अपेक्षित आहे. त्यांना १००० कोटींची डील मिळणार असल्याची खात्रीसुद्धा असल्याचं म्हटलं जातंय. नमित मल्होत्रा यांना ओटीटीकडून १००० कोटींची डील हवी आहे जेणेकरून ४००० कोटींमधील १०००कोटी ओटीटीमधून वसूल होतील. यामुळे ३००० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य उरेल.

दरम्यान, रणबीर कपूरसह ‘रामायण’ या चित्रपटामध्ये दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी, अभिनेता यश, सनी देओल, रवी दुबे, आदिनाथ कोठारे, अरुण गोविल, बॉबी देओल यांसारखे काही लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमधून झळकणार आहेत. पहिला भाग या दिवाळीत तर दुसरा भाग २०२७ मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.