Ranbir Kapoor praises Sai Pallavi’s casting as Sita in Ramayana movie : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या ‘रामायण’ या बिग बजेट पौराणिक चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. यामध्ये रणबीर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत आहे. तर त्याच्याबरोबर सीतेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी झळकणार आहे. अशातच आता रणबीरनं साईबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
साई पल्लवी दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री असून तिनं आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम करत तिच्या सहज सुंदर अभिनयानं आणि नृत्यशैलीनं लक्ष वेधलं आहे. आता ती पहिल्यांदाच बिग बजेट बॉलीवूड चित्रपटातून झळकणार आहे. ‘रामायण’ या चित्रपटातून सई पहिल्यांदाच रणबीरबरोबर काम करत आहे. अशातच आता रणबीरनं साईचं कौतुक केलं आहे.
२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण’ या चित्रपटाचा टीझर भारतात प्रदर्शित झाला. पण, त्याआधी या चित्रपटाचा टीझर लॉस एंजेलिसमध्ये रिलीज झाला होता. त्यावेळी तेथील कार्यक्रमात ‘रामायण’ चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित होती. त्यावेळी रणबीरला चित्रपटातील त्याची सहअभिनेत्री साईबद्दल विचारल्यानंतर त्यानं प्रतिक्रिया देत ती या चित्रपटासाठी योग्य निवड असल्याचं म्हटलं आहे. यासह त्यानं दाक्षिणात्य अभिनेता यश जो यामध्ये रावणाची भूमिका साकारत आहे त्याचंही कौतुक केलं आहे. रणबीर नेमकं काय म्हणाला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
रणबीरनं केलं साई पल्लवीचं कौतुक
एक्सवरील एका व्हिडीओमध्ये रणबीर साईबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना दिसत आहे. त्याला यावेळी तुझी सहअभिनेत्री सध्या इथे उपस्थित नाहीये. तुला तिच्या कामाबद्दल काही बोलायला आवडेल का असं विचारल्यानंतर रणबीर म्हणाला, “आपण सगळेच जाणतो की साई किती उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तुम्हाला माहिती आहे, तिने खूप काही साध्य केलं आहे. पहिल्याच दिवशी, जेव्हा मी तिला सीतेच्या भूमिकेत पाहिलं, तेव्हा मी फक्त नितेश सरांकडे पाहिलं, आणि आम्हा दोघांनाही लगेच समजलं की तिच्यापेक्षा योग्य कास्टिंग आपण करूच शकलो नसतो.”
Ranbir On How he Felt After Watching Sai Pallavi first time as Sita Ji.#Ramayana pic.twitter.com/EvelZmnSzc
— RK? (@rksbunny) April 2, 2026
रणबीरनं केलं यशचं कौतुक
रणबीर चित्रपटात रावणाच्या भूमिकेत असलेला दाक्षिणात्य अभिनेता यशबद्दलही बोलला आहे. त्यानं यशचंही कौतुक केलं आहे. रणबीर यशबद्दल म्हणाला, “यश, अर्थातच, त्याच्याकडे प्रचंड स्टारडम आहे. रावणाची भूमिका साकारण्यासाठी अशी व्यक्ती हवी, ज्याच्याकडे तो प्रभाव आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्स असेल.”
Yash Has Aura and Screen Presence to Play Raavana! He comes with Stardom- RK#Ramayana pic.twitter.com/ScnEYmU3Wx
— RK? (@rksbunny) April 2, 2026
दरम्यान, दिवाळीत रणबीर कपूरचा ‘रामायण’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रणबीर व साई पल्लवी आणि यश यांच्याबरोबर या चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. यामध्ये सनी देओल, आदिनाथ कोठारे, अरुण गोविल, रवी दुबे यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.
