Ranbir Kapoor Ramayana movie Scene Leak Video: ‘रामायण’ सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याचा सिनेमातील लूक पाहायला मिळाला. त्याच्या लूकवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला होता आणि सिनेमा पाहण्याची उत्सुकता असल्याचेदेखील म्हटले होते. या सिनेमात रणबीर कपूरबरोबर अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. आता हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे या सिनेमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रणबीर कपूरच्या ‘रामायण’ सिनेमातील व्हिडीओ झाला लीक?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला या व्हिडीओची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काही जण हा व्हिडीओ एआय जनरेटेड असल्याचे म्हणत आहेत; तर काही जण त्यातील व्हीएफएक्सची चर्चा करीत आहेत. फॅन पेजवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या वेशात धनुष्यबाण हातात घेऊन एका रहस्यमय प्राण्यावर निशाणा साधताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी असा दावा केला आहे की, चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आयोजित करण्यात आलेल्या एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान हे फुटेज रेकॉर्ड करण्यात आले आहे. मात्र, या सगळ्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. एका गटाचे मत आहे की, हा चित्रपटातील खरा लीक झालेला सीन आहे; तर दुसरा गट हा व्हिडीओ AI चा वापर करून तयार करण्यात आल्याचा दावा करीत आहे. काही नेटकऱ्यांनी असेही म्हटले आहे की, हा व्हिडीओ प्रत्यक्ष चित्रपटातील नसून CinemaCon मध्ये दाखवण्यात आलेल्या फुटेजमधील असू शकतो.

एका नेटकऱ्याने लिहिले, “संपूर्ण सीन लीक झाला आहे. पोस्ट करा आणि आनंद घ्या. हा सीनही CinemaConमधीलच आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले, “हा AI ने तयार केलेला व्हिडीओ आहे आणि जर हा खरोखरच चित्रपटातील सीन असेल, तर ‘रामायण’साठी ही गोष्ट चांगली नाही.” एकाने लिहिले, “इतके मोठे चित्रपट निर्माते सिनेमातील सीनचा लीक झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ देतील, यावर लोक कसे विश्वास ठेवतात? DNEGसारख्या कंपनीने लगेच कॉपीराईट स्ट्राइक पाठवला असता. नकारात्मकता पसरवण्यासाठी AI च्या मदतीने तयार केलेला हा बनावट व्हिडीओ आहे.”

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असली तरीही निर्माते, दिग्दर्शक व कलाकार यांपैकी कोणीही कोणतीही माहिती दिलेली नाही किंवा त्यावर प्रतिक्रियाही दिलेली नाही. या सिनेमाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. सिनेमात रणबीर कपूरबरोबर सनी देओल, साई पल्लवी, यश हे प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत.