Ranbir Kapoor Ramayana Part 1 Cast Arun Govil Praise : रणबीर कपूरचा बहुप्रतीक्षित ‘रामायण : पार्ट १’ सिनेमा चर्चेत आला आहे. नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमामध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीराम, तर साई पल्लवी माता सीता व दाक्षिणात्य स्टार यश रावणाची भूमिका साकारणार आहे. सिनेमाची स्टार कास्ट चर्चेत असून, नेटकऱ्यांनी रणबीर कपूर साकारणार असलेल्या प्रभू रामांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली होती. त्यानंतर आता रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतून घराघरांत ओळख निर्माण केलेल्या अरुण गोविल यांनी ‘रामायण : पार्ट १’ सिनेमात राजा दशरथ ही भूमिका साकारली आहे. त्यांनी यापूर्वी मालिकेत साकारलेली रामाची भूमिका एक मैलाचा दगड ठरली आहे. आता रणबीर कपूरच्या कास्टिंगवर शंका घेतली जात असताना अरुण गोविल यांनी रणबीर कपूरच्या अभिनयाचे कौतुक केले. तसेच तो दर वेळी आवर्जून त्यांना वाकून नमस्कार करीत असल्याचा उल्लेख अरुण गोविल यांनी केला.

रणबीर कपूरबद्दल काय म्हणाले अरुण गोविल?

अरुण गोविल म्हणाले, “रामायणाची एक अशी परिभाषा नाही. रामायण हेच आपला मान, गौरव, अभिमान आणि संस्कृती आहे. माझ्यासाठी सर्व काही रामायणच आहे. प्रभू राम हे कसे बोलत असतील, कसे चालत आणि बसत असतील, याचा मी विचार करतो. त्यातील दोन-चार गोष्टी या रणबीर कपूरमध्ये आधीपासूनच आहेत. मला असे कधीच वाटत नव्हते की, एक स्टार अभिनेता येऊन पाया पडेल; पण तो नेहमी तसा नमस्कार करत होता.”

पुढे अरुण गोविल म्हणाले, “सध्या जेपण काही तरुण कलाकार आहेत, उपलब्ध आहेत, त्यातील रणबीर कपूर हा प्रभू रामांची भूमिका करण्यासाठी सर्वांत योग्य अभिनेता आहे.”

रणबीर कपूरच्या कास्टिंगबाबत काय म्हणाले दिग्दर्शक नितेश तिवारी?

दिग्दर्शक नितेश तिवारी म्हणाले, “भारतात अशी धारणा आहे की, श्रीराम यांचे गुण किंवा व्यक्तिमत्त्व यातील काही केवळ एक टक्का जरी आपण आत्मसात केले, तरी आपण एक उत्तम माणूस बनू शकतो. त्यामुळे ते स्वतः किती महान व्यक्तिमत्त्व असतील, याची केवळ कल्पनाच करता येईल. म्हणूनच श्रीरामाच्या भूमिकेसाठी योग्य कलाकाराची निवड करणे हे जवळपास अशक्य काम आहे; पण आपण प्रयत्न करू शकतो. जेव्हा नमितने रणबीरच्या नावाचा उल्लेख केला, तेव्हा मलाही वाटले की, तो या भूमिकेसाठीच्या सर्व निकषांमध्ये अगदी योग्य ठरतोय.”