Ranbir Kapoor Ramayana Part 1 Release Date: रणबीर कपूरच्या ‘रामायण : भाग १’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असून, सिनेमा दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता ‘रामायण’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. ‘रामायण: भाग १‘ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी जाहीर केली आहे.

‘रामायण’ सिनेमा कधी होणार प्रदर्शित?

‘रामायण’ या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा करीत असून, तो दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी पहिल्या भागाच्या प्रदर्शनाची तारखेत बदल करण्यात आला आहे. आता रणबीर कपूरचा ‘रामायण’ सिनेमा येत्या ५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामध्ये रणबीर कपूर प्रभू राम, साई पल्लवी ही माता सीता, तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर दाक्षिणात्य स्टार अभिनेता यश रावणाची प्रभावी भूमिका साकारताना दिसणार आहे.

अरुण गोविल दशरथ तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत

तसेच रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल हे या चित्रपटात राजा दशरथ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत; तर सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे. जुलै महिन्यात चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून ‘रामायण’ची चर्चा अधिकच वाढली आहे.जबरदस्त कलाकारांचे कास्टिंग, दमदार व्हीएफएक्स आणि भव्य सेटिंग यांमुळे चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. तसेच हे सर्व कलाकार त्यांच्या भूमिकांना कसा न्याय देणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘रामायण: भाग १’ची पटकथा पुरस्कारविजेते लेखक श्रीधर राघवन यांनी लिहिली आहे. तर ऑस्करविजेते हॅन्स झिमर व ए. आर. रहमान यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. प्राइम फोकस स्टुडिओज, आठ ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या VFX स्टुडिओ DNEG यांची निर्मिती आणि मॉन्स्टर माईंड क्रिएशन्सच्या सहकार्याने रामायण सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. भव्य निर्मिती आणि कोट्यवधींचे बजेट असलेला ‘रामायण: भाग १’ हा येत्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

रणबीर कपूरने त्याने साकारलेल्या प्रभू श्रीरामांच्या भूमिकेबाबत मत व्यक्त केले होते. तो म्हणालेला, “ही भूमिका जेव्हा माझ्याकडे आली, तेव्हा माझ्या मनात पहिला एकच प्रश्न आला होता की, मी या भूमिकेसाठी योग्य व्यक्ती आहे का? हे फक्त प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारणं नाही, तर त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची ही जबाबदारी मलाच का दिली जात आहे, असे प्रश्न मलाही सुरुवातीला पडले होते. पण, काही वेळातच मला या भूमिकेचं महत्त्व, जबाबदारी आणि निर्मात्यांचा हेतू समजला. चार हजार वर्षांपासून ही कथा आजही तितकीच अर्थपूर्ण आहे. प्रत्येकाच्या मनात प्रभू श्रीरामांची वेगळी प्रतिमा आहे आणि त्यामुळे कोणत्याही एका अभिनेत्याला सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणे शक्य नाही. प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी तोच अभिनेता योग्य ठरू शकतो, ज्याचा हेतू शुद्ध आहे आणि ज्याचा प्रभू श्रीरामांच्या प्रवास व व्यक्तिमत्त्वावर नितांत विश्वास व श्रद्धा आहे.”