रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘रामायण’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त तो साई पल्लवी, रवी दुबे यांच्याबरोबर ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये प्रमोशनसाठी गेला असताना त्याने त्याच्या खासगी आयुष्यातील खास किस्सा सांगितला आहे. यावेळी रणबीरने आलियाला त्याने कसं प्रपोज केलं होतं याबद्दल सांगितलं आहे.

रणबीर कपूरने आलियाला कसं केलं होतं प्रपोज?

रणबीर कपूर व आलिया भट्ट बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. दोघे अनेकदा एकमेकांबद्दल बोलताना दिसतात. आता अमिताभ बच्चन यांच्याबरोबर या कार्यक्रमात संवाद साधताना त्याने त्याच्या बायकोला लग्नाआधी कसं प्रपोज केलं होतं याचा किस्सा सांगितला आहे. रणबीर म्हणाला, “मी आधीच आमचे जे गाइड होते, ड्रायव्हर होते त्यांना सांगून ठेवलं होतं की तुम्ही पुढे मध्येच कुठेतरी थांबवा. मी अंगठी घेऊन गेलो होतो की मी गुडघ्यांवर बसल्यानंतर तुम्ही दुरून फोटो काढा कारण मुलींना फोटो खूप आवडतात. त्यांना इन्स्टाग्रामवर टाकायचे असतात. त्यामुळे मला वाटलं की आलियासाठी हे खूप महत्त्वाचं असेल”. त्यावर अमिताभ बच्चन गंमतीत म्हणाले, “एक पुरावा असला पाहिजे”. त्यावर रणबीर म्हणाला, “हो पण अंगठी पुरावा होतीच. घरुन घेऊन गेलो होतो”.

रणबीरने पुढे त्या दिवशीचा प्रसंग सांगत म्हणाला, सर वातावरण असं होतं की तीन वाघ एका बाजुला होते १०० फुटाच्या अंतरावर, माझी वाघीन माझ्या समोर होती आणि उंदराप्रमाणे माझ्या गुडघ्यांवर बसलो होतो की बेबी माझ्याशी लग्न करशील का तो माझ्या आयुष्यातील एक अद्भूत अनुभव आहे. यानंतर अमिताभ बच्चन यांनी खूप छान असं म्हणत त्याचं कौतक केलं.

रणबीरने आलियाला केन्या येथील मसाई मारामध्ये प्रपोज केल्याचं म्हटलं जातं. रणबीर आलियाला प्रपोज करतानाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. आलियाही अनेकदा रणबीरबद्दल बोलताना तो किती चांगला नवरा आणि वडील आहे याबद्दल सांगत कौतुक करत असते. दोघे अनेकदा त्यांची लेक राहाबरोबर एकत्र सार्वजनिक ठिकाणी पाहायला मिळतात.

दरम्यान, याच कार्यक्रमात रणबीरने राहाचा जन्म झाल्यापासून एकही दिवस असा गेला नाहीये की त्याने अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील हनुमान चालिका ऐकली नसेली असं सांगितलं. यामधून त्याने त्याची लेक दररोज हनुमान चालिसा ऐकते असं म्हटलं आहे.