Ranbir Kapoor Ramayana Hans Zimmer : हान्स झिमर हे हॉलीवूडमधील काही प्रसिद्ध संगीतकारांपैकी एक आहेत. आजवर त्यांनी हॉलीवूडच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांना संगीत व पार्श्वसंगीत दिलं आहे. त्यांच्या संगीताचे जगभर चाहते आहेत. हॉलीवूडच्या ‘ग्लॅडिएटर’पासून ‘द लायन किंग’ आणि ‘इन्सेप्शन’पासून ‘इंटरस्टेलर’पर्यंत गाजलेल्या चित्रपटांना संगीत देण्याचं काम हान्स झिमर यांनी केलं आहे. हॉलीवूडचे हे प्रसिद्ध संगीतकार आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहेत. रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘रामायण’ या चित्रपटासाठी त्यांचं संगीत लाभलं आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर, साई पल्लवी व यश यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची पहिली झलक नुकतीच निर्मात्यांनी प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. या टीझरबद्दल चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी माहिती शेअर केली होती. तीन मिनिटं आणि तीन सेकंदांचा ‘रामायण’चा टीझर डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. सोशल मीडियावर या टीझरची साध्या बरीच चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर या टीझरच्या पार्श्वसंगीताचेही अनेक जण कौतुक करीत आहेत.
‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटाचे संगीतकार हान्स झिमर हे आहेत. ‘रामायण’साठी संगीत देण्यासाठी हान्स झिमर यांनी सुरुवातीपासूनच उत्सुकता दाखवली होती. त्यांना ए. आर. रहमान या भारतीय संगीतकाराचीसुद्धा साथ लाभली आहे. ‘रामायण’ चित्रपटाच्या टीझरमधील संगीत ऐकून अनेकांनी हान्स झिमर व रहमान या संगीतकार जोडीचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर या दोघांवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आलिया भट्टने शेअर केला रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा टीझर
“हान्स झिमर तुम्ही कमाल आहात”, “हान्स झिमर तुमच्या संगीतानं तुम्ही आजवर अनेकांना मंत्रमुग्ध केलं आहे आणि ते आता पुन्हा एकदा सिद्ध झालं”, “हान्स झिमर यांचं रामायण टीझरमधील संगीत खरोखरच अंगावर शहारा आणत आहे”, “हान्स झिमर आणि ए. आर. रहमान ही जोडी आहे म्हणजे नक्कीच प्रेक्षकांना संगीताची नवी पर्वणी घडणार” या आणि अशा अनेक कमेंट्स करीत प्रेक्षकांनी ‘रामायण’ला दिलेल्या संगीताबद्दल हान्स झिमर यांचं कौतुक केलं आहे.
हान्स झिमर यांचं आजवरचं उल्लेखनीय काम म्हणजे क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘इंटरस्टेलर’साठी त्यांनी दिलेलं संगीत. त्याशिवाय ‘द लायन किंग’ (१९९४) व ‘ड्यून’ (२०२१) यांसाठी त्यांना मूळ सर्वोत्कृष्ट संगीतासाठी दोन अकादमी पुरस्कार मिळाले आहेत. त्याशिवाय त्यांना एकूण १२ वेळा नामांकनही मिळालं आहे. अशातच हे दिग्गज संगीतकार ‘रामायण’च्या संगीतासाठी ए. आर. रहमान यांच्याबरोबर काम करीत आहेत.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’मध्ये श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर कपूर आहे. तसेच रावणाच्या भूमिकेत अभिनेता यश, साई पल्लवी ही सीता यांच्या भूमिकेत आणि सनी देओल हनुमान यांच्या भूमिकेत आहेत. तसेच रवी दुबे हे लक्ष्मणाची भूमिका साकारत आहेत. दरम्यान, ‘रामायण’ची पहिली झलक पाहूनच सर्वांना चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.