अभिनेता रणबीर कपूर( Ranbir Kapoor) अनेकदा मुलीबरोबर म्हणजेच राहा कपूरबरोबर असलेल्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलत असतो. राहाबरोबरचे त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता त्याने एका मुलाखतीदरम्यान राहाच्या जन्मानंतर त्याच्यात काय बदल झाले, याबद्दल खुलासा केला आहे. काय म्हणाला रणबीर कपूर? रणबीर कपूरने निखिल कामथच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने राहाबरोबरचे त्याचे नाते कसे आहे, यावर भाष्य केले आहे. तो म्हणतो, "राहाच्या जन्मानंतर जेव्हा पहिल्यांदा तिला मी माझ्या हातात घेतले होते, तो क्षण माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान होता. ज्याक्षणी मी वडील झालो, त्यावेळेपासून माझे आयुष्य बदलले. मला वाटले माझा पुनर्जन्म झाला आहे. आयुष्याची ४० वर्षे मी कोणतेतरी वेगळे आयुष्य जगलो आहे, असे वाटले. नवीन भावना, नवीन विचार माझ्या मनात येऊ लागले. मी कधीच मरणाला घाबरत नव्हतो. मी कायम हा विचार करायचो की, मी वयाच्या ७१ व्या वर्षी मरेन, कारण आठ या आकड्याबद्दल मला प्रचंड आकर्षण आहे. पण, राहाच्या जन्मानंतर असे वाटते की, ७१ व्या वर्षी मरणे खूप लवकर होईल. राहामुळे सर्वकाही बदलले आहे, मी माणूस म्हणून बदललो आहे." हेही वाचा: Bigg Boss Marathi 5 : पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांच्या तोंडचे पाणी पळणार, पाहा व्हिडीओ पुढे बोलताना रणबीर कपूरने म्हटले आहे की, मला वयाच्या १७ व्या वर्षी सिगारेट ओढायची सवय लागली होती. ही सवय मला गेल्या वर्षापर्यंत होती. मात्र, ज्यावेळी वडील झालो, त्यावेळी मला असे वाटू लागले की, मी फार आरोग्यदायी गोष्टींचा विचार करत नाही. त्यानंतर मी सिगारेटची सवय सोडली. राहाच्या जन्माविषयी बोलताना त्याने म्हटले आहे की, जेव्हा आलिया गर्भवती होती, त्यावेळी मला इतके काही वाटायचे नाही. पण, ज्यावेळी राहाचा जन्म झाला आणि डॉक्टरांनी तिला माझ्या हातात दिले, तो क्षण मी शब्दात सांगू शकत नाही. तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कोणीतरी तुमचे हृदय तुमच्या हातात काढून ठेवल्यासारखे वाटले. अशा भावना याआधी मला कोणासाठी आणि कशासाठी आल्या नव्हत्या. पुढे तो म्हणतो, राहा आलियाला तिचा एक भाग समजते. आलियाला वेगळी व्यक्ती समजत नाही. जेव्हा तिला मजा मस्ती करायची असते, त्यावेळी तिला मी पाहिजे असतो. दरम्यान, आलिया आणि रणबीर कपूरने १४ एप्रिल २०२२ ला लग्नगाठ बांधली असून ६ नोव्हेंबर २०२२ ला राहाचा जन्म झाला आहे.