scorecardresearch

रणबीर कपूरने सांगितले वडिलांच्या जाण्यामुळे आयुष्यात घडलेले बदल; म्हणाला “तुम्ही कुटुंबाच्या…”

रणबीर आणि श्रद्धाच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत

ranbir kapoor rishi kapoor
फोटो : इंडियन एक्सप्रेस

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर रणबीर कपूर श्रद्धा कपूरबरोबर एका हलक्या फुलक्या रोमॅंटिक कॉमेडी चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. सध्या हे दोघेही याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. कोविड काळात रणबीरने त्याचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना गमावलं.

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये रणबीरने याबद्दल खुलासा केला आहे. वडिलांच्या जाण्यामुळे नेमका काय बदल त्याच्यात घडला आहे याविषयी त्याने खुलासा केला आहे. पीटीआयशी संवाद साधताना रणबीर म्हणाला, “तुमच्या आई वडिलांपैकी कोणा एकाचा मृत्यू तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. ही गोष्ट खासकरून तुम्ही जेव्हा वयाच्या चाळीशीमध्ये असता तेव्हाच घडते, यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आणखी जवळ येता. आयुष्याचा खरा अर्थ तुम्हाला समजतो. या काळात बऱ्याच चांगल्या आणि वाईट गोष्टी घडतात. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर आलियासारखी बायको मला मिळाली, राहा आमच्या आयुष्यात आली. आयुष्यात असे चढ-उतार येतच असतात.”

आणखी वाचा : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची ‘ही’ गोष्ट पाहताच चाहते झाले भावूक; कॉमेंट करत म्हणाले…

आपल्या वडिलांच्या आजाराबद्दल आणि त्या अनुभवाबद्दल रणबीर म्हणतो, “एक कलाकार म्हणून ही गोष्ट तुम्हाला चटका लावून जाते. जेव्हा माझ्या वडिलांना कॅन्सरचं निदान झालं आणि त्यांचे उपचार सुरू होते तेव्हा मी ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘शमशेरा’ या दोन्ही चित्रपटावर काम करत होतो. ‘ब्रह्मास्त्र’ बघताना आज बऱ्याच आठवणी माझ्या डोळ्यासमोर येतात, पण काही सीन्स बघताना मला माझ्या वडिलांचे आजारपण, त्यांची ढासळणारी प्रकृती, त्याने उपचार, केमोथेरपी यांची आठवण येते.”

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून रणबीरने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता रणबीर आणि श्रद्धाच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच रणबीरच्या आगामी ‘अॅनिमल’ या चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे. यातील रणबीरचा डॅशिंग लूक चाहत्यांना चांगलाच पसंत पडला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 12:36 IST