Himani Shivpuri Talks About Ranbir Kapoor : रणबीर कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. येत्या काळात रणबीर ‘रामायण’ व ‘लव्ह अँड वॉर’ या बहुचर्चित चित्रपटांतून झळकणार आहे. अभिनेता या चित्रपटांसाठी जोरदार तयारी करत आहे. अशातच आता ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली असून, अभिनेत्याचं कौतुक केलं आहे.
हिमानी शिवपुरी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत रणबीर कपूरचं कौतुक केलं असून, त्याच्यावर चांगले संस्कार असल्याचं म्हटलन् आहे. यावेळी त्यांनी त्या रणबीरचे वडील दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबरोबर ‘आ अब लौट चले’ चित्रपटाचं शूटिंग करत असताना त्यांची रणबीर कपूरबरोबर भेट झाल्याची आठवण सांगितली आहे. हिमानी शिवपुरी रणबीरबद्दल नेमकं काय म्हणाल्या आणि त्यांनी कोणता किस्सा शेअर केला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
इन्स्टाग्रामवर रणबीर कपूरबरोबरचा फोटो शेअर करत हिमानी म्हणाल्या, “शुभ सकाळ. रणबीरला भेटून खूप आनंद झाला. तो खूप चांगला माणूस आणि हुशार कलाकार आहे. त्यानं माझ्या पाया पडत आशीर्वाद घेतले आणि माझं कौतुक करत म्हणाला मॅडम तुम्ही अजूनही आधी सारख्याच दिसता. हे त्याच्यावरचे चांगले संस्कार आहेत.”
रणबीरबद्दल अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “त्यानं ‘आ अब लौट चले’दरम्यानच्या आठवणी सांगितल्या. तेव्हा तो यूएसएमध्ये शिक्षण घेत होता आणि जेव्हा चित्रपटाच्या सेटवर यायचा तेव्हा चिंटूजी (ऋषी कपूर) रणबीरला माझ्याबरोबर गायनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी यायला सांगायचे.”
परदेशातील आठवणी सांगत हिमानी पुढे म्हणाल्या, “मी पहिल्यांदा यूएसएला गेल्यानंतर शॉपिंग सोडून तिथल्या बोर्डवेच्या कार्यक्रमांना हजेरी लावायचे. खूप मज्जा आली आणि रणबीर कपूरनंसुद्धा खूप काळजी घेतली. आम्ही सर्व जणांनी त्यावेळी एकमेकांबरोबर खूप गप्पा मारल्या. त्यावेळी सतीश कौशिक, परेश रावल यांच्याप्रमाणेत सरोज खानसुद्धा उपस्थित होत्या.” १९९९ मध्ये बनलेल्या ‘आ अबलौट चले’ या चित्रपटात अक्षय खन्ना, ऐश्वर्या राय हे मुख्य भूमिकांत होते, ज्याचं दिग्दर्शन ऋषी कपूर यांनी केलेलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला.
