दिवंगत बॉलिवूड अभिनेते राजीव कपूर हे राज कपूर यांचे चिरंजीव होते. ते ऋषी कपूर व रणधीर कपूर यांचे धाकटे भाऊ होते. वडील आणि भावांप्रमाणे त्यांचे करिअर चांगले गाजले नाही, त्यामुळे त्यांचे वडिलांशी मतभेद होऊ लागले. नंतर दोघांच्या नात्यातील अंतर इतके वाढले की वडिलांच्या शेवटच्या क्षणीही राजीव त्यांना भेटले नाही. करिअर फ्लॉप ठरलंच पण वैयक्तिक आयुष्यातही त्यांना अपयश आलं. प्रेमविवाहानंतरही त्यांना संपूर्ण आयुष्य एकटंच घालवावं लागलं. त्यांची पत्नी कोण होती व आता काय करते, जाणून घेऊयात.
आज दिवंगत राजीव कपूर यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म २५ ऑगस्ट १९६२ रोजी झाला होता. ‘राम तेरी गंगा मैली’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. चित्रपट हिट झाला पण त्याचा करिअरमध्ये त्यांना फायदा झाला नाही. चित्रपटातील अभिनेत्री मंदाकिनीला चित्रपट हिट झाल्याचा फायदा झाला. राजीव आपल्या फ्लॉप करिअरसाठी वडील राज कपूर यांना दोषी मानत राहिले. यामुळेच वडिलांसोबतचे त्यांचे नाते आयुष्यभर सुधारू शकले नाही. त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चांगले राहिले नाही. त्यांनी आरती सभरवालशी प्रेमविवाह केला होता. या लग्नाला राज कपूर यांचा विरोध होता, पण तरीही त्यांनी लग्न केलं होतं.
दोन वर्षात मोडला प्रेमविवाह
आरती सभरवाल आणि राजीव कपूर यांचा प्रेमविवाह झाला होता. पण दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. दोन वर्षांतच त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांचा घटस्फोट झाला. राजीव यांना मुलं खूप आवडायची, पण त्यांना स्वतःचं मूल नव्हतं. राजीव यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर आरतीने दुसरं लग्न केलं नाही.
“विचारण्याची पद्धत असते की नाही”? ‘गदर २’च्या निर्मात्यांवर संगीतकाराचा संताप; नेमकं काय घडलं?
एकेकाळी कपूर घराण्याची सून असलेली आरती आता कुठे आहे?
राजीव कपूर यांची पूर्वाश्रमीची पत्नी ५६ वर्षीय आरती सभरवाल सध्या लाइमलाइटपासून दूर दिल्लीत राहते. आरतीने न्यूयॉर्कमधील पार्सन स्कूल ऑफ डिझाईन आणि आर्किटेक्टमधून पदवी पूर्ण केली होती. रिपोर्ट्सनुसार, पतीपासून घटस्फोट झाल्यानंतर ती कॅनडाला शिफ्ट झाली होती. तिथे ती एका लॉ फर्ममध्ये काम करत होती. नंतर तिने नोकरी सोडली आणि २००४ साली ती दिल्लीला परतली आणि तिने स्वतःचा फॅशन ब्रँड ‘Zachaire’ लाँच केला. मात्र, तो यशस्वी होऊ शकला नाही, नंतर तिने लोणच्याचा व्यवसाय सुरू केला. तिच्या लोणच्याच्या ब्रँडचे नाव ‘पिकल पॉकल’ आहे.