scorecardresearch

रक्ताने माखलेले कपडे, कुऱ्हाड अन् ओठात सिगारेट; रणबीरच्या ‘ॲनिमल’चं पोस्टर पाहून चाहत्यांनी केली पुष्पाशी तुलना

संदीप वांगा रेड्डी यांनी हा चित्रपट खूप हिंस्त्र असणार आहे असा खुलासाही केला होता

रक्ताने माखलेले कपडे, कुऱ्हाड अन् ओठात सिगारेट; रणबीरच्या ‘ॲनिमल’चं पोस्टर पाहून चाहत्यांनी केली पुष्पाशी तुलना
फोटो : सोशल मीडिया

बॉलिवूडचा पुढील जनरेशनचा सुपरस्टार म्हणून रणबीर कपूरकडे फार आशेने पाहिलं जातं. गेल्यावर्षी रणबीरचा ‘शमशेरा’ चांगलाच आपटला पण ‘ब्रह्मास्त्र’ने मात्र सगळं भरून काढलं. ‘ब्रह्मास्त्र’ सुपरहीट झाला आणि काहीच महिन्यात रणबीर आणि अलियाला कन्यारत्न झाल्याची बातमी समोर आली. यामुळे दोघे चांगलेच चर्चेत आले. दरम्यान रणबीर आणि आलिया दोघेही कामातून काही काळ ब्रेक घेणार अशीही चर्चा होऊ लागली, पण काही दिवसांपूर्वी रणबीर त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रुजू झाला.

या चित्रपटातील रणबीरचा लूक मध्यंतरी व्हायरल झाला होता, आता त्याच्या याच नवीन चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. ‘अर्जुन रेड्डी’, ‘कबीर सिंग’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे संदीप वांगा रेड्डी यांच्या आगामी ‘ॲनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूर झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

आणखी वाचा : “ज्यांना धड हिंदीदेखील..” शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हाचं वक्तव्य चर्चेत

नावाप्रमाणेच या चित्रपटात रक्तपात बघायला मिळणार अशी अपेक्षा होतीच, आता रणबीरचा लूक पाहून याची खात्री झाली आहे. या पोस्टरमध्ये रणबीर पांढऱ्या कपड्यात दिसत आहे, आणि त्याचा पांढरा शर्ट पूर्णपणे रक्ताने माखला आहे, हातावर जखम आहे, शिवाय त्याच्या काखेत एक कुऱ्हाड दिसत आहे जी रक्ताने माखलेली आहे. वाढलेली दाढी आणि केस, रक्ताने माखलेले हात अशा डॅशिंग अवतारातही रणबीर पोस्टरवर सिगारेट शिलगवताना दिसत आहे.

रणबीरचा हा लूक पाहून त्याच्या चाहत्यांनी चांगलीच प्रशंसा केली आहे. रणबीरचे चाहते गेले कित्येक दिवस त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. नेटकऱ्यांनी रणबीरच्या या लूकची तुलना थेट ‘पुष्पा’शी करायला सुरुवात केली आहे. मध्यंतरी ‘ॲनिमल’चा एक छोटासा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यावरून या चित्रपटात एक बाप आणि मुलगा यांच्यातील नातंसुद्धा आपल्याला बघायला मिळणार असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, परिणीती चोप्रा, बॉबी देओल, सौरभ शूक्लासारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत. एका जुन्या मुलाखतीमध्ये संदीप वांगा रेड्डी यांनी हा चित्रपट खूप हिंस्त्र असणार आहे असा खुलासाही केला होता. ११ ऑगस्ट २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 09:38 IST

संबंधित बातम्या