Ranbir Pushp on Nana Patekar: नाना पाटेकर हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या स्वभावासाठीदेखील ओळखले जातात. अनेक कलाकार नाना पाटेकरांना पटकर राग येतो, असे विविध मुलाखतींमध्ये सांगतात. आता राष्ट्रीय पुरस्कार विजेते रणबीर पुष्प यांनी नाना पाटेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी नाना पाटेकरांबरोबर १९९६ ला प्रदर्शित झालेल्या अग्नी साक्षी या सिनेमात काम केले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते नाना पाटेकर यांच्याबद्दल म्हणाले, “लोकांनी त्यांच्याबद्दल चुकीची मतं बनवली आहेत.” नाना पाटेकर यांच्यामुळे निर्मात्यांचं नुकसान होतं, असेही दावे अनेकजण करतात. यावरही रणबीर यांनी वक्तव्य केले. तसेच त्यांनी नाना पाटेकरांचा एक किस्साही सांगितला. ते म्हणाले की शेतकरी आत्महत्यांमुळे त्रस्त असलेल्या अनेक कुटुंबांची परिस्थिती नानांनी पाहिली होती. त्यावेळी त्यांनी १.५ कोटी रुपयांची कार खरेदी न करता शेतकऱ्यांना मदत करण्याचे ठरवले. त्यांनी एका मित्राच्या मदतीने प्रत्येक कुटुंबाला १५ लाख रुपये दिले.”

ते असेही म्हणाले, “जो माणूस शेतकऱ्यांचे अश्रू पुसतो, तो कोणाचंही नुकसान करू शकत नाही. त्यांनी ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली, ज्यासाठी आजपर्यंत मोठ्या प्रमाणात निधी जमा केला आहे. ते स्वतः शेतात राहतात.”

नाना पाटेकर यांना राग का येतो?

नाना पाटेकर यांना राग येतो पण त्याची कारणे योग्य असतात, असे म्हणत रणबीर पुष्प यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “एकदा नानांनी एका चालत्या कारमधून रस्त्यावर प्लास्टिकची बाटली फेकताना पाहिलं. पुढे सिग्नलवर त्यांनी कार थांबवली आणि ड्रायव्हरला खिडकी उघडायला सांगितले. तिथे जवळच एक स्वच्छतेचा संदेश देणारा एक होर्डिंग होता.”

पुढे ते म्हणाले, “त्या होर्डिंगवर महात्मा गांधीजींचा फोटो होता. त्याकडे बोट दाखवत म्हणत नाना त्याला म्हणाले की भारत स्वच्छ कोण ठेवणार? गांधीजी आज आपल्यात नाहीत; पण तुम्ही अजून या पृथ्वीवर आहात. मग देश स्वच्छ ठेवणं ही नागरिक म्हणून तुमची जबाबदारी नाही का? तुमची कार कचरापेटी आहे असं समजून मी ही बाटली तुमच्या कारमध्ये फेकू का? मेरा भारत महान नाही, तर तुमच्यासारख्या लोकांमुळे त्रस्त आहे, जे देश स्वच्छ ठेवू शकत नाहीत. याकडे तुम्ही राग म्हणून बघू शकता. पण, तुम्ही याकडे मार्गदर्शन म्हणूनही बघू शकता”, असे म्हणत नाना पाटेकरांच्या रागाबद्दल त्यांनी वक्तव्य केले.