Randeep Hooda Baby Girl First Photo : बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डाची मुलगी आज, १० एप्रिल रोजी एक महिन्याची झाली. १० मार्च रोजी त्याची पत्नी अभिनेत्री लिन लैशराम हिने मुलीला जन्म दिला. मुलगी एक महिन्याची झाल्यानंतर रणदीपने तिचं नाव जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर लेकीचा पहिला फोटोही रणदीप हुड्डाने पोस्ट केला आहे.
रणदीप हुड्डाने दोन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. दोन्ही फोटो त्याची पत्नी लिन व लेकीचे आहेत. एका फोटोत लिनने लेकीला जवळ घेतलंय, तर दुसऱ्या फोटोत ती प्रेमाने मुलीकडे बघतेय. या फोटोबरोबर रणदीप हुड्डाने एक व्हॉइस नोट शेअर केली आहे, ज्यात त्याच्या लेकीच्या नावाचा उच्चार कसा आहे ते त्याने सांगितलं.
रणदीपने फोटोंच्या कॅप्शनमध्ये मुलीचं नाव व त्या नावाचा अर्थही सांगितला. त्याने मुलीचं तीन अक्षरी नाव ठेवलं आहे. रणदीपने मुलीचं नाव ‘न्योमिका’ असं ठेवलंय. “आमच्या आयुष्याचा एक नवीन केंद्रबिंदू
न्योमिका हुड्डा – दैवी कृपा, स्वतंत्र आणि आकाशासारखी अथांग,” असं कॅप्शन रणदीपने दिलं आहे.
पाहा पोस्ट
रणदीपच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, रणदीपच्या मुलीचा जन्म त्याच्या वडिलांच्या वाढदिवशीच झाला. त्यामुळे त्याने आनंदाची बातमी शेअर करताना ही खास गोष्ट शेअर केली होती.
रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम यांनी २९ नोव्हेंबर २०२३ रोजी लग्न केलं होतं. अत्यंत पारंपरिक ‘मैतेई’ पद्धतीने लग्न केले. या लग्नासाठी रणदीपने पांढरा धोतर-कुर्ता आणि डोक्याला ‘कोक्येत’ फेटा बांधला होता, तर लिनने ‘पोटलोई’ हा पारंपरिक मणिपुरी पोशाख परिधान केला होता. रणदीपने हे लग्न महाभारतातील अर्जुन आणि मणिपूरची राजकन्या चित्रांगदा यांच्या विवाहापासून प्रेरित असल्याचे सांगितले होते. लग्नानंतर त्यांनी ११ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईत एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले होते.
मुलीच्या जन्मानंतर बरोबर एक महिन्याने, म्हणजेच १० एप्रिल २०२६ रोजी, रणदीप आणि लिनने सोशल मीडियावर मुलीचे नाव आणि तिचा पहिला फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. हे नाव रणदीपची बहीण अंजली हुड्डा यांनी निवडलं आहे.
