Randeep Hooda’s New look : बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डाने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये अभिनेता एका वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नवीन चित्रपटाबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. रणदीप त्याची प्रत्येक भूमिका चोख पार पाडतो. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याचं अनेकांकडून कौतुक करण्यात आलं होतं. या चित्रपटासाठी त्यानं स्वत:वर खूप मेहनत घेतली होती. तो त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी खास मेहनत घेत असतो.

रणदीपने शेअर केलेली ही पोस्ट त्याच्या नवीन चित्रपटातील भूमिकेसंबंधित आहे का, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. या पोस्टला अभिनेत्याने दिलेल्या कॅप्शनने लक्ष वेधले आहे. तर त्याने नुकत्याच शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याचा वेगळाच लूक पाहायला मिळतोय. त्याने त्याचे अर्धे टक्कल असलेला फोटो शेअर केला आहे. त्यासह त्याच्या चेहऱ्यामध्येही थोडा बदल जाणवत आहे. त्यामुळे हा लूक त्याच्या नवीन चित्रपटातील भूमिकेसाठी आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रणदीपने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोखाली प्रेक्षकांनी कमेंट्स केल्याचे पाहायला मिळते. एका नेटकऱ्याने या पोस्टखाली “हा लूक नवीन बायोपिकसाठी आहे का” असे म्हटले आहे. दुसऱ्याने, “नवीन प्रोजेक्ट”, अशी कमेंट केली आहे. काहींनी तो सुभाषचंद्र बोस यांचा चरित्रपट बनवणार आहे का अशा कमेंट्सही केल्या आहेत. एकूणच त्याचे चाहते या लूकमागचे कारण जाणून घेण्यासाठी उत्सूक असल्याचे पाहायला मिळत आहे.

रणदीप हुड्डाने २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी स्वत:मध्ये अनेक बदल केल्याचे सांगितले होते. या चित्रपटासाठी त्याने २८ दिवसांत १८ किलो वजन कमी केल्याचे सांगितले होते. या भूमिकेसाठी त्याने त्याच्या आहारातही लक्षणीय बदल केले होते. त्याबाबत त्याने मागे एका मुलाखतीमध्ये माहिती दिली होती. रणदीप प्रत्येक भूमिकेला त्याचे १०० टक्के देण्याचा प्रयत्न करतो आणि कामाप्रति असलेली त्याची शिस्त यांसारख्या गोष्टींमुळेच तो प्रत्येक भूमिका चोख पार पाडतो. यासाठी त्याचे चाहते त्याचे कौतुकही करीत असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रणदीपच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तो नुकताच ‘जाट’ चित्रपटातून झळकला होता. त्यामध्ये त्याच्यासह प्रसिद्ध अभिनेता सनी देओलही महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळाला. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. १० एप्रिल २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता त्याच्या या पोस्टमुळे तो नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.