राज कपूर यांचे चिरंजीव, करीना कपूर व करिश्मा कपूर यांचे वडील ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी हाथ की सफाई (१९७४), चाचा भतीजा (१९७७), रामपूर का लक्ष्मण (१९७२) आणि जवानी दिवानी (१९७२) या हिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. पण ते अशाच प्रकारच्या भूमिकांमध्ये टाइपकास्ट झाले आणि त्याचा त्यांच्या करिअरला फटका बसला. पुढे करिअरला उतरती कळा लागली आणि त्यांना दारूचं व्यसन जडलं.

दारूच्या व्यसनाचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम झाला. रणधीर व बबिता राज कपूर यांच्या संगम चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. दोघे प्रेमात पडले पण त्यांचा लग्नाचा विचार नव्हता. वडील राज कपूर यांनी बबिताशी लग्न करायला लावलं, असं रणधीर कपूर कपिल शर्मा शोमध्ये म्हणाले होते. “माझा टाइमपास सुरू होता. वडिलांनी विचारलं, ‘लग्नाचा विचार आहे की नाही? ती म्हातारी झाल्यावर तिच्याशी लग्न करणार का?’ मग मी लग्न केलं,” असं रणधीर कपूर म्हणाले.

मी खूप दारू प्यायचो- रणधीर कपूर

रणधीर आणि बबिता यांचे १९७१ मध्ये लग्न झाले. त्यावेळी बबिता एक प्रसिद्ध अभिनेत्री होती, पण तेव्हा कपूर कुटुंबातील महिलांना चित्रपटांमध्ये काम करण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे बबिताने अभिनय सोडला. १९८० च्या दशकात रणधीर यांच्या करिअरला उतरती कळा लागली. त्यांना ‘फ्लॉप अभिनेता’ म्हटलं जाऊ लागला. याचा त्यांच्या लग्नाला फटका बसला. तोपर्यंत त्यांच्या दोन्ही मुलींचा जन्म झाला होता. त्यामुळे रणधीर खूप दारू पिऊ लागले. अखेर १९८८ मध्ये ते त्यांच्या आई-वडिलांबरोबर राहायला निघून गेले. त्यांनी मुलींना पत्नीबरोबर सोडलं. त्यावेळी करिश्मा १४ आणि करीना ८ वर्षांची होती.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या जुन्या मुलाखतीत, रणधीर यांनी खूप दारू प्यायल्याचं मान्य केलं. “तिला समजलं की मी वाईट माणूस आहे, जो खूप दारू पितो आणि घरी उशिरा येतो. तिला या गोष्टी आवडायच्या नाहीत. मला तिच्या मर्जीने जगायचं नव्हतं आणि प्रेमविवाह असला तरी ती मला आहे तसा स्वीकारू शकत नव्हती. पण आम्हाला दोन सुंदर मुली होत्या, ज्यांचं संगोपन करायचं होतं. तिने त्यांना उत्तमरित्या वाढवलं. दोघींनी त्यांच्या करिअरमध्ये छान काम केलंय,” असं रणधीर कपूर म्हणाले होते.

Randhir Kapoor with Kareena Kapoor Karisma Kapoor and Babita Kapoor
रणधीर कपूर व बबिता कपूर मुलींबरोबर (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

माझ्या मुली माझ्यापेक्षा जास्त कमावतात – रणधीर कपूर

भावना सोमय्या यांच्याशी एका रेडिओ चॅनेलवर बोलताना, रणधीर यांनी स्वतःला ‘वाईट वडील’ म्हटलं होतं. “मी खूप वाईट वडील होतो, मी बावळट होतो. खरं तर सर्वांनाच माहितीये की मी असाच आहे. मला खूप कष्ट करायचे नाहीत, मला चित्रपटांमध्ये फार काम करायचं नाही, ऑफर अजूनही येतात, मी त्या स्वीकारत नाही. मी माझ्या आयुष्यात जे कमवायचं होतं ते कमावलं. आता माझ्या मुली माझ्यापेक्षा खूप जास्त कमावतात, म्हणून मी समाधानी आहे. आमच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण होतात. आमच्याकडे सगळं आहे, मग मला आणखी काय हवं? या वयात मी सकाळपासून रात्रीपर्यंत का काम करावं?”, असं रणधीर कपूर म्हणाले होते.

बबिताने बिझनेस करून मुलींना वाढवलं

रणधीर कपूर पत्नी व मुलींना सोडून निघून गेले. मग बबिताने मुलींच्या संगोपनासाठी रिअल इस्टेटसह अनेक व्यवसाय सुरू केले. २००७ मध्ये मुंबई मिररला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत करीनाने त्यासंदर्भात सांगितलं होतं. “माझी आई नेहमीच काही ना काहीतरी करत असायची. तिने एकटीने आम्हाला वाढवलं. इतर लहान व्यवसायांव्यतिरिक्त तिचा रिअल इस्टेट व्यवसाय आहे. तिच्यासाठी सगळं सांभाळणं कठीण होतं,” असं करीना म्हणाली होती.

मला चांगलं आयुष्य देण्यासाठी आई व करिश्माने संघर्ष केला – करीना

“लोक कपूर घराण्याबद्दल विचार करतात तसं आम्ही ऐषोआरामात वाढलो नाही. माझ्या आई आणि बहिणीने मला चांगलं आयुष्य देण्यासाठी खूप संघर्ष केला. विशेषतः माझी आई, कारण तिने एकटीने आम्हाला वाढवलं,” असं करीना म्हणाली होती.

करिश्मा लोकल ट्रेनने कॉलेजला जायची. तर करीना स्कूल बसने शाळेत जायची. त्यांच्याकडे एख कार होती, पण ड्रायव्हर ठेवायला पैसे नव्हते. या सर्व अनुभवांमुळेच आम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकलो. कारण आम्हाला कष्टाची, संघर्षाची जाणीव आहे, असं करीनाने म्हटलं होतं.

मी माझ्या श्रीमंत मुलींना मला दत्तक घ्या म्हणतो – रणधीर कपूर

सुरुवातीला रणधीर कपूर यांचा करिश्माच्या चित्रपटांमध्ये काम करण्यास विरोध होता. तिने अभिनय करू नये, असं त्यांनी म्हटलं होतं. पण मुली यशस्वी झाल्यावर त्यांनी त्यांचा निर्णय स्वीकारला. तसेच मुली आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत असल्याचं त्यांनी कबुल केलं होतं.

“बबिताने पुन्हा लग्न केलं नाही आणि तिचा तसा विचारही नाही, माझाही नाही. ती अजूनही माझी पत्नी आहे आणि मी तिचा अविचारी, भयंकर पती आहे,” असं रणधीर कपूर मुंबई मिररशी बोलताना म्हणाले होते. “माझ्या मुली आयुष्यात स्थिरावल्या आहेत. माझ्या दोन्ही मुली माझ्यापेक्षा श्रीमंत आहेत आणि मी त्यांना म्हणतो की तुमचा बाबा म्हणून मला दत्तक घ्या, जेणेकरून मीही श्रीमंत होऊ शकेन. मी अजूनही कधीकधी बबिताबरोबर जेवायला जातो, आम्ही एकत्र जेवतो, गप्पा मारतो, हसतो. आम्ही असेच आहोत,” असं रणधीर कपूर यांनी म्हटलं होतं.